पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

सांगली, कोल्हापुरात विजांचा कडकडाट

- रत्नागिरीत गारांचा पाऊस

पुणे : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज (शनिवार) सायंकाळच्या सुमारास पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अवकाळी पाऊस पडला. काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याचेही वृत्त आहे.

पुणे, पिंपरीत पाऊस

पुणे शहरासह उपनगरात आज सायंकाळी पाचच्या सुमारास ढग दाटून आले अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पिंपरी चिंचवडसह भोसरीमध्ये अवकाळी पाऊस आल्याने राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आला. पावसामुळे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे भाषण ऐकायला आलेल्या सर्व मतदारांनी सभास्थळ सोडले. मिळेल त्याठिकाणी उभं राहून पाऊस थांबण्याची सर्व वाट पाहत होते. पावसाचे जोर वाढल्याने नागरिकांना अ़डचणींना सामोरे जावे लागले.

सांगली, कोल्हापुरात विजांचा कडकडाट

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस पडला. सांगलीच्या शिराळा, वाळवा, कडेगाव, तालुक्यात पाऊस झाला. सांगलीसह परिसरात वादळी वारा आणि विजेचा कडकडाट झाला. उन्हाने त्रस्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरीत गारांचा पाऊस

रत्नागिरीत गारांसह जोरदार पाऊस झाला. संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे गारांचा जोरदार पाऊस पडला. अवकाळी पावसाने आंबा पीक धोक्यात आले असून, बागायतदार चिंताग्रस्त आहेत.

Web Title: Heavy rain in Pune Western Maharashtra and Kokan