सांगली, सातारा, कोल्हापुरात तीन दिवस अतिवृष्टी होणार

टीम ई-सकाळ
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

विभागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत येत्या तीन दिवसात हवामान विभागाने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

पुणे : पुणे विभागात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर असून, विभागातील ५८ तालुक्यांपैकी ३० तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. विभागातील सर्व धरणे भरून वाहत आहेत. विभागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत येत्या तीन दिवसात हवामान विभागाने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

तसेच विभागातील सोलापूर वगळता चार जिल्ह्यांत एनडीआरएफचे पथक तैनात असून, ओडीसा राज्यातून एनडीआरएफच्या पाच टीम दाखल होणार आहेत. मदतीसाठी प्रशासन सज्ज असून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पुणे विभागातील पूरस्थिती, मदत व बचाव कार्याबाबत देशमुख यांनी संबंधित विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पूर परिस्थिती आणि केल्या जाणाऱ्या उपाययोजनाबद्दल बैठकीत माहिती दिली.

माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात सुरु असणाऱ्या अतिवृष्टीमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या धोका पातळी ओलांडून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन गावांचा पूर्णतः संपर्क तुटला असून, या गावात अंदाजे सात हजार लोक अडकले आहेत. या बाधित लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग सातारा ते कोल्हापूर दरम्यान तीन ठिकाणी पाणी आल्याने बंद झाला आहे. विभागातील १०३ मोठ्या पुलांपैकी ३४ पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही गावांचा पूर्णतः तर काही गावांचा अंशतः संपर्क तुटला आहे.

अतिवृष्टीमुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, प्रत्येक धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांत व शहरात पाणी घुसले आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असून पुराचा धोका कमी झाला आहे. उजनी धरणातूनही पाणी सोडण्यात येत असल्याने पंढरपूर शहरामध्येही पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य बाधित कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे काम सुरु असून ७०० पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. सोलापूर जिल्ह्यातील लहान-मोठे तलाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून भरून घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

पुणे विभागातील 12 हजार 228 कुटुंबातील 53 हजार 582 नागरिकांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पूर परिस्थितीत मदत व पुनर्वसनासाठी पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. त्याचबरोबर प्रादेशिक आर्मीची ८० जणांची पथकेही मदतीसाठी तैनात आहेत. रत्नागिरीवरून कोस्ट गार्डचे एक पथक उद्यापर्यंत कोल्हापूरला पोहचेल तसेच गोव्यातील हेलिकॉप्टरसह एक पथक कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे. सांगली जिल्ह्यातील ९ हजार जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, तेथे सुरु असणाऱ्या चार छावण्यासह इतर तात्पुरत्या स्वरूपात छावण्या उभारण्याचे काम सरू आहे.

पुणे महसूल विभागात आतापर्यंत 133 टक्के पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस  सांगली जिल्ह्यात 208 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात 164 टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात 110 टक्के तर सातारा जिल्ह्यात 168 टक्के तसेच सोलापूर जिल्ह्यात ७८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 343 कुटुंबातील 13 हजार 336 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील जुनी  सांगवी,  दापोडी,  रहाटणी,  वाकड, रावेत, पिंपरी  या  परिसरातील  काही  भाग  बाधीत  झाला असल्याची माहिती त्यांनी या बैठकीत दिली.

यावेळी मदत पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी महसूल विभागाबरोबरच पाटबंधारे, पुरवठा, विद्युत, कृषी या विभागाचाही आढावा घेतला.  पूरग्रस्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांना लागेल ती मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी यावेळी निर्देश दिले.

सातारा जिल्ह्यातील 598 कुटुंबाला सुरक्षितस्थळी हलवले

सातारा जिल्ह्यातील 598 कुटुंबांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कोयना धरणातून १ लाख १९ हजार ७२७ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा-लोणंद, जुना  सातारा-पुणे, तारगाव-नांदगाव रोड, पाटण-मुळगाव, कराड-तांबवे, उंब्रज-मसूर, वाई-मांढरदेव आदी मार्ग पुरामुळे  बंद  झाले  आहेत. 

सांगली- सांगली व मिरज शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील 6 हजार 526 कुटुंबाना  सुरक्षित स्थळी हलविले आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 651  कुटुंबातील  7 हजार 293 नागरिकांना  सुरक्षितस्थळी  हलविण्यात  आले आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भीमा नदी काठावर राहणाऱ्या गावातील नागरिकांना सतर्क  राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in Sangli Satara and Kolhapur for Next 3 days