दुसऱ्या टप्प्यात दणकून पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामाच्या दुसऱ्या टप्प्‍यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) देशात सर्वसाधारण म्हणजेच १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (आयएमडी) जाहीर केला आहे. या अंदाजात ८ टक्के कमी-अधिक तफावत होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात देशात ९९ टक्के पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जून महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार मॉन्सून हंगामात सर्वसाधारण म्हणजेच ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज होता. गुरुवारी (ता. १) दुसऱ्या टप्प्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अंदाजातही जूनचा सर्वसाधारण पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. यात ऑगस्टमध्ये देशात ९९ टक्के पाऊस पडण्याची व त्यात ९ टक्के कमी-अधिक तफावत असण्याची  शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस सरासरी इतका मानला जातो. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी इतका (९९ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता ४५ टक्के असल्याचेही हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

प्रिन्सिपल कॉम्पोनंट रिग्रेशन (पीसीआर) व मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टीमनुसार (एमएमसीएफएस) हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मॉन्सून मिशन मॉडेलनुसार मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे मॉन्सून एकूण हंगामातील (जून ते सप्टेंबर) पावसापैकी ४९ टक्के पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पडतो. १९६१ ते २०१० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार या दोन महिन्यांत देशात ४२८.३ सेमी पाऊस होतो.

‘एल निनो’ स्थिती सर्वसामान्य
प्रशांत महासागरातील समुद्रसपाटीचे तापमान आणि वातावरणीय स्थिती ही ‘एल निनो’ सर्वसामान्य स्थितीत असल्याचे संकेत देत आहेत. तर, हिंद महासागराच्या विषुववृत्तीय भागात सकारात्मक इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेलनुसार मॉन्सून हंगामात या दोन्ही स्थिती कायम राहणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in second phase