राज्यभरात पूर 'पंचमी'; धरणे तुडुंब 

राज्यभरात पूर 'पंचमी'; धरणे तुडुंब 

मुंबई/पुणे : मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रविवारी मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. गंगापूर, खडकवासला, कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. गंगापूर धरणातून सुमारे अडीच लाख क्‍युसेकने पाणी सोडले जात असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे.

पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रायगड या जिल्ह्यांतील नद्यांनी धोक्‍याची पातळी गाठली आहे. राज्यातील काही भागांत पावसाने दाणादाण उडवल्याने "पूरपंचमी' साजरी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

मुंबई आणि उपनगरांत रविवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. उपनगरांतील रस्ते जलमय झाले असून, रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पायपीट करावी लागली. ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जनजीवन विस्कळित राहिले असून, ठिकठिकाणी पाणी साचल्याने रेल्वेसेवा कोलमडली आहे. उद्या सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली आहे. नदीशेजारील अनेक पूल पाण्याखाली गेले असून जूगावातील सुमारे 37 जणांची पुरातून सुटका करण्यात आली. शीव-पनवेल महामार्गावरील नेरूळचा परिसर जलमय झाला असून ठाणे-बेलापूर मार्गावर महापेजवळ भुयारी मार्ग पाण्याखाली गेला आहे. दिवसभर हार्बर मार्गावरील वाहतूक बंद होती. पनवेल तालुक्‍यातील घोट गावात हाजीमलंग नदीच्या पात्रातील पाणी घुसले आहे. रायगड जिल्ह्यात वडखळ नाक्‍यावर पाणी आले असून मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला. रस्ते खचल्याने, जलमय झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अंबानदीने धोक्‍याची पातळी ओलांडली असून गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. पेण शहर जलमय झाले असून, शेकडो गावे धोक्‍याच्या छायेखाली आहेत. अंतोरे गावात पाण्यात अडकलेल्या 65 जणांची सुटका करण्यात आली असून रोह्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे विस्कळित झाली आहे. महाडला पुराचा तडाखा बसला आहे. पालघर जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून गाव-पाड्यांसह शहरांतही पूरस्थिती आहे. वसईच्या पूर्वपट्टीतील 50 गावांचा संपर्क तुटला आहे. 

पुण्यात पाऊस कायम 
गेल्या आठवडाभरापासून पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे भरली आहेत. पाऊस कायम राहणार असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुटी देण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सातपर्यंत नदीकाठच्या 800 कुटुंबांचे स्थलांतर केले असून कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. विमान, लोकल, एसटी सेवा सुरळीत असून मुंबई मार्गावरील दोन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुळा, मुठा आणि पवना नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता खडकवासला धरणातून 35 हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. 

गोदावरीच्या पुराचे रौद्ररूप 
नाशिक : गोदावरीला 2 ऑगस्ट 2016 नंतर पहिल्यांदा आलेल्या महापुराने नाशिकमध्ये हाहाःकार उडवला आहे. नंदिनी, वाघाडी, कपिला, वालदेवी नद्यांना महापूर आला असून शहरातील 12 पुलांवरून पाणी वाहू लागल्याने जनजीवन विस्कळित झाले. तसेच गोदाकाठच्या सायखेडा, चांदोरी, शिंगवे, दारणा सांगवी, शिंपी टाकळी, नागापूर, चापडगाव, भुसे यांसह कादवाकाठच्या कोकणगाव, वडाळीनजीकला महापुराचा वेढा पडला आहे. त्र्यंबकेश्‍वरच्या ज्योतिर्लिंग मंदिरात महापुराचे पाणी शिरले. अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वे आणि एस. टी. वाहतूक विस्कळित झाली. निफाड तालुक्‍यातील सहाशे कुटुंबे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. निफाड-विंचूर मार्ग बंद करत वाहतूक विंचूर, लासलगाव, पिंपळगाव बसवंत मार्गे वळवण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक बंद पडली होती. पेठ, सुरगाणा, इगतपुरी, नाशिक, दिंडोरी तालुक्‍यांतील गावांचा पुराच्या तडाख्यामुळे संपर्क तुटला. अतिवृष्टीची स्थिती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून सोमवारी (ता. 5 जुलै) नाशिक शहर आणि जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदूरमधमेश्‍वर धरणातून जायकवाडीसाठी 2 लाख 62 हजार क्‍युसेस पाण्याचा विसर्ग केल्याने दारणा धरणाचे सर्व दरवाजे उघडले आणि गंगापूर, कश्‍यपी, गौतमी गोदावरी, पालखेड, करंजवण, वाघाड, आळंदी, पुणेगाव, भावली, मुकणे धरणातून पाणी सोडले 

सांगलीत महापूर उंबरठ्यावर 
सांगली : 2005 च्या महापुराची खपली आता कुठेही बसलीय, असे वाटत असतानाच पुन्हा कृष्णा नदी महापुराच्या उंबरठ्यावर उभी आहे. सांगली शहरात धोक्‍याच्या पातळीपासून कृष्णा अवघी तीन फूट दूर असून आयर्विन पुलाजवळ पातळी 42 फुटांवर पोचली आहे. वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्‍याला या परिस्थितीचा मोठा फटका बसला असून शंभराहून अधिक गावे आणि वाड्यावस्त्यांवर पाणी शिरले आहे. या गावांतील हजारो लोकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. कोयना धरणातील पाणीसाठी तब्बल 96 टीएमसी झाला असून आता कोयनेत पाणी रोखून धरणे जवळपास अशक्‍य आहे. कोयनेतून 50 हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो आता वाढवावा लागेल, मात्र इकडे पाऊस सुरूच राहिला तर मात्र कृष्णेची पातळी झपाट्याने वाढून ती धोक्‍याच्या पातळीवर जाईल, अशी स्थिती आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणातून 2 लाख 33 हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तो तीन लाखापर्यंत वाढवावा लागेल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई आणि कोकण 
मुंबई आणि उपनगरांत दिवसभर पाऊस. वसई, ठाण्यात शेकडो अडकले. वसईच्या मिठागरात अडकलेल्या नागरिकांची सुटका. वसईत चौदा वर्षांचा मुलगा वाहून गेला. कल्याण ते कर्जत दरम्यानची सिग्नल यंत्रणा पाण्यात. रेल्वेसेवेला दोन दिवस फटका बसण्याची शक्‍यता. पेणजवळील दुष्मीरनजीक जमीन खचली. कल्याण- शीळफाटा, कल्याण- मुरबाड मार्ग दिवसभर बंद. कोकणात मुसळधार पाऊस. कोकण रेल्वे ठप्प. मुंबई- गोवा महामार्ग वगळून सर्व रस्ते बंद. रत्नागिरीत समुद्राला उधाण आल्याने किनारपट्टी भागात पाणी घुसले. खेडमध्ये अनेक रस्ते पाण्याखाली. राजापूर, मंडणगडमध्ये पूरस्थिती, चिपळूणमध्ये पाणी भरण्यास सुरवात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्‍याला पावसाने झोडपले. कणकवली येथे महामार्गावर पाणी. 

पश्‍चिम महाराष्ट्र 
पुण्यात मुसळधार पावसाचा बाजारपेठेवर परिणाम. मुठा नदीला पूर. मुळशी धरण परिसरात अतिवृष्टीसदृश परिस्थिती. जिल्ह्यात शाळा- महाविद्यालयांना सोमवारी (ता. 5) सुटी जाहीर. माणगाव बाजूने पुण्याकडे येणारी वाहतूक बंद. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांसह विभागातील अन्य धरणेही भरली.  साताऱ्यात कोयना धरणात सकाळी 11 वाजता 94.94 टीएमसी पाणीसाठा. उजनीतही 88.79 टीएमसी साठा. पुण्यात पावसाचा जुलैमधील दहा वर्षांतील विक्रम मोडला. पुणे- बंगळूर महामार्गाच्या सेवामार्गावर पुराचे पाणी. मुंबईहून कोल्हापूरला येणारी महालक्ष्मी एक्‍स्प्रेस रद्द. कोल्हापूरची पंचगंगा धोक्‍याच्या पातळीवर. सांगली, मिरजसह वाळवा, शिराळ्यात पूर. चांदोली धरणाचे दरवाजे पाच फुटांनी उचलले. नगर जिल्ह्यात घोड धरण ओव्हरफ्लो. भीमा नदीत एक लाख क्‍युसेकपेक्षा अधिक विसर्ग. सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या पन्नास टक्केच पाऊस. 

विदर्भ 
गडचिरोली जिल्ह्यात भामरागडचा संपर्क तुटला. दोन दिवसांपासून मुसळधार. अकोल्यात आठवडाभरापासून रिपरिप. 

मराठवाडा 
नांदेड जिल्ह्यात चोवीस तासांत 29.97 मिलिमीटर पाऊस. दिवसभर ढगाळ वातावरण. परभणीत पावसाची हजेरी. हिंगोली जिल्ह्यात चोवीस तासांत 26.82 मिलिमीटर पाऊस. मराठवाड्यात रिमझिम पावसाची हजेरी. जायकवाडी धरणाचा साठा 15 टक्‍क्‍यांवर. दमदार पावसाची प्रतीक्षा. 

खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र 
नाशिक जिल्ह्यात गोदावरीला महापूर. नंदिनी, वाघाडी, कपिला, वालदेवीसह दारणा, बाणगंगा नद्यांना पूर. त्र्यंबकेश्‍वरच्या ज्योतिर्लिंग मंदिरात महापुराचे पाणी. नाशिक- औरंगाबाद वाहतूक बंद. नदीकाठच्या कुटुंबांचे स्थलांतर. नाशिक- पुणे वगळता अन्य मार्गांवरील एसटी वाहतूक बंद. धुळे जिल्ह्यात संततधार. साक्री तालुक्‍यातील गावांचा संपर्क तुटला. जळगाव, नंदूरबार जिल्ह्यांत पाऊस. धडगाव- भुनावड रस्त्यावरील पूल तुटला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com