मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टी; उत्तर महाराष्ट्रातील विविध भागांत दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 July 2020

उत्तर महाराष्ट्राच्या विविध भागांत दमदार हजेरी लावली आहे.मराठवाड्यात सातत्याने जोरदार पाऊस सुरूच आहे.शुक्रवारी(ता. २४)सकाळपर्यंतच्या२४तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे

पुणे - गेले काही दिवसांपासून दडी मारणाऱ्या पावसाने गुरुवारपासून (ता. २३) उत्तर महाराष्ट्राच्या विविध भागांत दमदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यात सातत्याने जोरदार पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धुळ्यातील शिंदखेडा येथे सर्वाधिक १६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

खानदेशात गुरुवारी (ता. २३) दुपारीनंतर अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. धुळ्यातील वडने व परिसरात जोरदार पावसाने शेतांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. जळगाव, धरणगाव, यावल, भुसावळ, धुळे, शिंदखेडा या भागांत जोरदार पाऊस झाला. धुळे तालुक्यातील वडने भागातील नाल्यांना पूर आला. शेतांमधील विहिरी तुडुंब भरल्या आहेत. अतिजोरदार पावसाने पूर्वहंगामी कापूस, सोयाबीन पिकांचे अंशतः नुकसान झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुन्हा पुनरागमन झाले. मोठ्या खंडानंतर पडलेल्या पावसाने वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. नांदगाव तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. निफाड व सिन्नर तालुक्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला. अद्यापही कळवण, सटाणा तालुक्यात मध्यम पाऊस आहे. मात्र, पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगर जिल्ह्यात चौथ्या दिवशी चांगल्या पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसाने पिके काळी पडू लागली आहेत. केडगाव, भिंगार, जेऊर, शेवगाव, पाथर्डी, संगमनेर, धांदरफळ, शिबलापूर, समनापूर, साकुर, अकोले यासह अनेक मंडळात मुसळधार पाऊस झाला. पुणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. हवेली, शिरूर, खेड, दौंड, बारामती, पुरंदर या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली. या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला असून, धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही हलका ते जोरदार पाऊस झाला. माहूर, देगलूर, मुखेड तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर होता. परभणीतील सेलू, मानवत तालुक्यातील अनेक मंडळात पावसाचा जोर अधिक होता.

(Edited by : Kalyan Bhalerao)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Central Maharashtra & Marathwada