कोकणात मुसळधार पावसाचा जोर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या किनाऱ्याला तडाखा बसला. मंगळवारी रात्रीपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढला आहे. 

वादळामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गुरुवारी अतिवृष्टीची शक्‍यता आहे. पालघर, ठाणे, मुंबईतही पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगावात वादळी पावसाचा अंदाज असून, कोल्हापूर आणि साताऱ्यातही हलका पाऊस शक्‍य आहे. 

विदर्भात सर्वत्र उष्णतेची तीव्र लाट असून, चंद्रपूर येथे बुधवारी 46 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी उष्ण लाट होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Konkan