कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर धुव्वाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहू लागल्याने या जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना आलेली पूरस्थिती कायम आहे.

पुणे  - कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर धुव्वाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहू लागल्याने या जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना आलेली पूरस्थिती कायम आहे. कोयना धरणातून विसर्ग वाढला असून, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला आहे, तर जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे ४५०, तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ४०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात तुफान पाऊस पडत आहे. धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने गोदावरीसह उपनद्यांना महापूर आल्याने जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला.  

सोमवारी नांदूर मध्यमेश्‍वर येथून पाण्याचा विसर्ग कमी केलेला असला तरी, पूरपरिस्थिती कायम होती. निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीकाठच्या लोकांनीही काळजी घेण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

पाणलोटात धुवाधार बरसात सुरूच असल्याने पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भीमा नदीच्या सर्व उपनद्यांना पूर आल्याने मुळा-मुठेसह भीमा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने या सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून एक लाख तीन हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोमवारी (ता. ५) दुपारी बारा वाजता आयर्विन पुलाजवळ पाण्याची पाण्याची पातळी ४५ फूट पाच इंच इतकी झाली. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. शेकडो घरात पाणी घुसले असून नागरिकांना स्थलांतर करावे लागले. राजापूर, चिपळूण, संगमेश्‍वरमध्येही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून पूरसदृश्‍य स्थिती आहे. 

खानदेशातील काही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. गिरणा धरणाचा साठाही वाढला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात सोमवारी (ता. ५) दुपारी दोन वाजेपर्यंत ४४.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागात झालेल्या अति जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला.

सोलापूर जिल्ह्यात सोमवारी (ता. ५) सकाळपासून अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. दिवसभर थांबून-थांबून त्याची रिपरिप सुरू होती. पण, किमान सुरवात झाली याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला

कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने विविध भागातील चार हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस मार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसामान्य स्थितीत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस सुरूच आहे. आज (ता.६) कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे, तर विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार, मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

३०० मि.मि.पेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे
जव्हार ४५० 
त्र्यंबकेश्वर ४०० महाबळेश्वर ३८० 
इगतपुरी ३७० 
दावडी ३७० 
ताम्हिणी ३५०
शिरगाव ३१० 
कोयना नवजा ३०० कोयना पाफळी ३००


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Konkan and Central Maharashtra