राज्यात महावितरणकडून छुपे भारनियमन

विनोद बेदरकर
शुक्रवार, 5 मे 2017

  • राज्याची कमाल वीज मागणी : 22, 500 मेगावॉट
  • सुरू असलेली वीजनिर्मिती : 19 हजार मेगावॉट
  • बंद संचामुळे विजेचा तुटवडा : 3 हजार मेगावॉट
  • उन्हाळ्यात वाढलेली मागणी : 1 हजार मेगावॉट
  • सुरू असलेली वीजनिर्मिती : 6912 मेगावॉट
  • खासगी व इतर स्रोतांकडील वीज : 4994 मेगावॉट

नाशिक - कोयनेतील पाणीटंचाईमुळे हजार मेगावॉट विजेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असतानाच, दुसरीकडे राज्यातील 8 औष्णिक वीजनिर्मिती संच बंद आहेत. मागणीच्या तुलनेत सुमारे 4 हजार मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यात अकृषक वाहिन्यांवरील डी, जी-1, जी-3 अशा चार गटांत महावितरणने छुपे, तात्पुरते भारनियमन सुरू केले आहे.

उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली असताना, देखभाल दुरुस्ती आणि पाणीटंचाईमुळे अनेक वीजनिर्मिती संच बंद आहेत. कोयनेतील पाण्याअभावी तेथील संच बंद पडल्याने एक हजार मेगावॉटचा तुटवडा वाढला आहे. अशातच कोराडी 3, परळी 2, चंद्रपूर 2, भुसावळ 1 याप्रमाणे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 8 संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि वीज संचाच्या देखभाल दुरुस्तीच्या एकत्रित प्रयत्नामुळे विजेची नियमित मागणी वाढली आहे. राज्यात विजेची कमाल मागणी 19 हजार 661 मेगावॉटपर्यंत वाढली असताना प्रत्यक्षात निर्मिती मात्र 13 हजार 562 मेगावॉट इतकीच सुरू होती. त्यामुळे साधारण 6 हजार 99 मेगावॉटपर्यंत वाढलेली तूट विविध प्रयत्नांतून भरून काढताना, सायंकाळी उशिरापर्यंत चार हजार मेगावॉटचा तुटवडा कायम होता.

छुपे भारनियमन सुरू
राज्यातील चार हजार मेगावॉटच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी वीज कंपनीने "जी' गटात समावेश होणाऱ्या या गटातील तिन्ही वर्गवारीतील शहर व ग्रामीण भागात भारनियमन सुरू केले होते. वीज कंपनीने कृषिपंपाच्या वीजवाहिन्या, ग्रामीण भागातील अकृषक वाहिन्यांसह डी, जी-1, जी-2, जी-3 अशा चार गटांतील गावामध्ये तात्पुरत्या नावाखाली छुपे भारनियमन सुरू केले आहे. विजेच्या बंद संचामुळे 3 हजार मेगावॉटचा तुटवडा वाढला आहे. उन्हाळ्यामुळे साधारण 1 हजार मेगावॉट विजेची मागणी वाढली आहे. खासगी व विविध स्रोतांकडून 4994 मेगावॉट इतकी वीज घेतल्यानंतरही मुंबईसह राज्यात 13562 मेगावॉट इतकीच सायंकाळी वीजनिर्मिती सुरू होती, तर विजेची मागणी 19,661 मेगावॉटपर्यंत वाढली होती. त्यामुळे साधारण 6 हजार मेगावॉटपर्यंत कमाल विजेचा तुटवडा वाढत असल्याचे सायंकाळी उशिरापर्यंतचे चित्र होते.

वीज केंद्र बंद संच संच क्रमांक
कोराडी 03 - 5, 6,10
परळी 02- 4, 5
चंद्रपूर 02- 6, 7
भुसावळ 01- 2

Web Title: hidden loadshading from mahavitaran in the state