बापरे!... जगावर आलंय कोरोनापेक्षाही महाभयानक संकट;काय आहे ही टोळधाड?

धनाजी सुर्वे
शुक्रवार, 29 मे 2020

शेतीसाठी ही टोळधाड अतिशय घातक आहे. ज्या शेतीवर ही टोळधाड पडते त्या शेतीचं होत्याचं नव्हतं होतं. हे टोळ फार आधाशीपणाणे खातात.

कोल्हापूर - कोरोनासारख्या महामारीच्या संकटानं देशासह संपूर्ण जगाचंच कंबरडं मोडलय. यात बळीराजा तर पुरताच कोलमडलाय. यातच आता त्याच्यासमोर टोळधाडीसारखं महाभयानक संकट उभं ठाकलंय. टोळधाडीचं हे संकट साधसुधं नसून त्याचं नुसतं नाव जरी एेकलं तर शेतकऱ्याच्या उरात घडकी भरते. आता हे संकट महाराष्ट्रातील विदर्भात पोहोचलंय. टोळधाड आली म्हणजे शेतच्या शेतं नष्ट होतात आणि त्यात शेतकरी पुरता भरडला जातो. टोळधाडीचा थवा उभ्या पिकाचा डोळ्यादेखत फडशा पाडताना बळीराजाला नुसतं त्यांच्याकड पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. परंतु, नुसत्या नावानं धडकी भरविणाऱ्या या टोळधाडीबद्दल अनेकांना खूप कमी माहिती आहे. उभ्या पिकाला उधवस्त करणारी टोळ धाड म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो. 

संपूर्ण जगाला धोका

एफएओचे वरिष्ठ टोळधाड अंदाज अधिकारी केथ क्रेसमॅन यांच्या मते, ‘वाळवंटीय टोळ ही चिंताजनक कीड असून याचा धोका संपूर्ण जगाला आहे. त्यामुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते.’’

खरचं असं झालं तर कोरानापेक्षा महाभयान संकटाला जगाला सामोरं जावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व आफ्रिकेतील टोळधाडीचं उग्र रुप पाहून ‘ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी विनाशकारी समस्या’असल्याचं मत संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवता विभागाचे प्रमुख मार्क लोकाक यांनी व्यक्त केलं होतं. पूर्व आफ्रिकेतून वाळवंटीय टोळचा शिरकाव भारत आणि पाकिस्तानात जूनमध्ये होईल, असा इशारा नुकताच एफएओने दिला होता. हा इशारा आता खरां ठरलाय.

Image may contain: plant, outdoor and nature

महाराष्ट्रात तर रब्बी हंगामात टोळधाडीच्या प्रादुर्भावाची शक्यता काही जाणकारांनी वर्तवली होती. मुबलक पाऊस पडून सर्वत्र हिरवळ पसरते, त्यावेळी टोळधाडीचा उद्रेक होत असतो, हा जगभरातील अनुभव आहे. त्यामुळंच देशात जून-जुलैमध्ये चांगल्या पाऊसमानानंतर ही टोळधाड धुडगूस घालते. परंतु, राज्यात वेळेआधीच मे मध्ये टोळधाडीचं महासंकट दाखल झालय. पाकिस्तानातून राजस्थान - गुजरात - मध्यप्रदेश मार्गे ही टोळधाड आपल्या राज्यातील अमरावती, वर्धा जिल्ह्यासह नागपुरातील काटोल आणि कळमेश्‍वर तालुक्‍यात देखील येऊन धडकलीय. त्यामुळं कोरोना लॉकडाउनने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता टोळधाडीला नियंत्रणात ठेवण्याचं एक नवं आणि अत्यंत कठीण आव्हान उभं राहिलंय.  

५८ वर्षांनंतर भारतावर महासंकट
भारतात गेल्या शंभर वर्षात प्रत्तेक वेळी पाच ते सात वर्षे टिकणाऱ्या दहाटोळ धाडींची नोंद आहे. त्यातील अगदी अलीकडची धाड १९५९ ते १९६२ या काळातील होती. १९६२ नंतर आता म्हणजे २०२० मध्ये ती पुन्हा नागपुरला आल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेरिक्‍चलर ऍण्ड बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेंट रिसर्चचे (सीबीएसआर) संचालक डॉ. मनोज रॉय यांनी दिली. 

टोळ आणि टोळधाड म्हणजे काय?
आॅर् थाॅप्टेरा गणातील लोकस्टिडी (ऑर्किडिडी) कुळातील टोळ हा आंतरराष्ट्रीय उपद्रवी कीटक मानला जातो. त्यांच्या धाडी येऊन ते पिकांचं आणि वनस्पतींचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. यामुळे होणाऱ्या नुकसानीचं वर्णन इजिप्शियन भाषिक व ग्रीक लोकांनी प्राचीन काळी नमूद केलंय. बायबलमध्ये पुष्कळ ठिकाणी त्यांचा उल्लेख आढळतो. टोळाचं इंग्रजी नाव लोकस्ट हे लॅटिन भाषेतून आलं असून त्याचा अर्थ जळालेली जमीन असा आहे. टोळधाड येऊन गेल्यावर तेथील प्रदेशाचं वर्णन यथार्थपणे या शब्दांत व्यक्त होतं. शिवाय भारत, उत्तर आफ्रिका, अरबस्थान, इराण, अफगाणिस्तान उत्तर आणि भूमध्य समुद्रातील बेटे या प्रदेशांत टोळधाडीने वेळोवेळी अतोनात नुकसान झाल्याबद्दलचे उल्लेख प्राचीन वाङ्मयात मिळातात.  

Image may contain: plant, outdoor and nature

किती भयंकर आहे ही टोळधाड?
शेतीसाठी ही टोळधाड अतिशय घातक आहे. ज्या शेतीवर ही टोळधाड पडते त्या शेतीचं होत्याचं नव्हतं होतं. हे टोळ फार आधाशीपणाणे खातात. त्यांचं खाणं सूर्योदयानंतर थोड्यावेळानं सुरू होतं आणि ते सूर्यास्तापर्यंत चालतं. प्रत्येक टोळ आपल्या वजनाइतकं (दोन ग्रॅम ) अन्न खातो. एक चौरस किलोमीटर क्षेत्राच्या थव्यातील टोळांचं वजन साधारणपणे 116 टन असतं. एका टोळधाडीत कोट्यावधी किडे असतात. पाच लाख बारा हजार एकर जमीय एका वेळी या टोळधाडीच्या पंखाखाली असते. 1889 मध्ये एक टोळधाड सुमारे पाच हजार चौरस किलोमीटर विस्ताराची होती. असा उल्लेख जुन्या नोंदीत आढळतो
.

असा असतो जीवन क्रम

टोळांचा जीवनक्रम नाकतोड्याच्या जीवनक्रमाप्रमाणेच असतो. त्यांच्या जीवनक्रमात अंडी, उड्या मारणारी पिल्ले आणि पंखांचे टोळ हे तीन टप्पे असतात. मादी ओलसर जमिनीत 7.5 ते 15 सेंटिमीटर भोक करून तीन ते सहा महिन्यांच्या काळात 300 ते 500 अंडी घालते. त्यातून बारा ते चौदा दिवसांत बिनपंखांची पिल्ले बाहेर पडतात. ती चार आठवड्यांच्या काळात पाच वेळा कात टाकतात व प्रौढावस्थेत जातात. प्रौढावस्थेत आल्यापासून एका आठवड्यात सामुदायिकरीत्या हे टोळ उड्डाण करतात. वर्षाकाठी त्यांच्या दोन ते चार पिढ्या होतात.
 

टोळांच्या अवस्था 
एका जातीचे टोळ वाढिच्या परिस्थितीप्रमाणे दोन निरनिराळ्या अवस्थांत आढळून येतात. एका अवस्थेला एकलेपणाची किंवा एकाकी अवस्था असे म्हणतात तर दुसऱ्या अवस्थेला थव्यांची किंवा सांघिक अवस्था म्हणतात. एकाकी अवस्था ही टोळांच्या प्रत्येक जातीची नैसर्गिक अवस्था असून त्या- त्या जातींचे जगाच्या विविध भागात नेहमीच या अवस्थेत आढळून येतात. त्यांच्याकडं उपद्रवी कीटक म्हणून पाहिलं जात नाही. टोळांची पिल्ले किंवा प्रोढ संघ गर्दी करून राहतात त्या वेळी उपद्रवी अवस्थेत असतात. एकाकी अवस्थेतील काही सुस्त असतात तर सांघिक अवस्थेतील टोळ नेहमी अस्थिर वृत्तीचे आणि काहिसे प्रक्षुब्ध स्थितीत असतात. 

प्रवास कसा असतो? 
उड्या मारणारी पिले एखादं मोठं सैन्य पुढं सरकतं त्याप्रमाणे लाखोंच्या संख्येने कित्येक चौरस किमी क्षेत्रावर दिवसा वाटचाल करतात. वाटेत मिळेल त्या झाडा -झुडपांची आणि पिकांची पाने खातात. दिवसाचं तापमान वाढतं त्या वेळी ही पिलं मिळेल त्या झाडांवर अथवा झुडपांवर विश्रांती घेतात. तापमान कमी झाल्यावर पुन्हा चालू लागतात. ढगाळ हवामानामुळं आणि जोराच्या वार्‍यामुळं पुढं सरकण्यास खंड पडतो तसंच संध्याकाळी चालीचा वेग कमी होतो व रात्री झाडांच्या बुंध्यापाशी टोळांची पिलं विश्रांती घेतात. ही टोळधाड एका दिवसात सुमारे 1.5 कीलोमिटर या हिशोबाने बत्तीस किलोमीटर अंतर कापते. 

टोळांचे थवे त्यांच्या उत्पत्तीच्या क्षेत्राबाहेर शेकडो किमी दूर जातात. परंतु, ते केवळ अन्नाच्या शोधार्थ जात नाहीत. वाढत्या तापमानामुळे थव्यातील टोळांची वाढती अस्वस्थता व हालचाल या गोष्टी त्यांच्या ब्राह्मणाला कारणीभूत असतात. उड्डाण करणाऱ्या थव्यांची दिशा ही सर्वसाधारणपणे वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा असतात. ताशी 16 ते 20 किमी पेक्षा जास्त वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेनं उड्डाण करू शकत नाहीत. निरनिराळ्या दिशांनी वाहणारं वारं जिथं एकत्र मिळतं तिथ हे टोळ जास्त संख्येने जमा होतात. 57 सेल्सिअस तापमानात पंधरा मिनिटे राहिल्यास टोळ जिवंत राहू शकत नाही. उडणाऱ्या टोळांचे थवे दूरवर ऐकू येणाऱ्या पाण्याच्या धबधब्याप्रमाणे आवाज उत्पन्न करतात. ते रोज आठ ते 40 किमी ( केव्हा- केव्हा 80 किलोमीटर पर्यंत) आणि एका ऋतुत 160 ते आठशे किमी किंवा त्याहून जास्त अंतरापर्यंत भ्रमण करतात.

उत्पत्तीचे ऋतू 

टोळांची उत्पत्ती निरनिराळ्या देशांत, निरनिराळ्या ऋतूंत होते. पश्चिम आशियातील इरानसारख्या देशात ती जानेवारी व जूनच्या दरम्यान होते. यातून उत्पन्न झालेले प्रोढ टोळ पूर्वेकडे पाकिस्तान आणि भारतात पावसाळ्याच्या सुरुवातीला पोहोचतात. या सुमारास या भागात अंडी घालण्यासाठी जमिनीची योग्य परिस्थिती निर्माण होते व त्या वेळी उडून आलेले टोळही पूर्ण वाढलेले आणि अंडी घालण्याच्या अवस्थेत असतात. राजस्थान, सिध आणि गुजरातच्या वाळवंटी प्रदेशात अंडी घालतात व त्यातून निर्माण झालेले बिनपंखी टोळ खरीप पिकांचं नुकसान करतात.  पावसाळ्याच्या शेवटी ते प्रौढ अवस्थेत जातात आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर ते पुन्हा पश्चिमेकडे जातात. जाताना वाटेत तयार खरीप पिकांचं आणि कोवळ्या अवस्थेतील रब्बी पिकांचं नुकसान करतात. शेवटी हे टोळ परत पश्चिम आशियातील देशांत पोहोचतात. हिवाळा तेथे काढून परत जानेवारी ते जून हंगामात पुन्हा अंडी घालतात. 

टोळधाडीच्या महाभयान जाती

जगातील कोणताही मोठा भूखंड टोळ धाडीच्या उपद्रवापासून मुक्त नाही. जगाच्या विविध भागांत टोळांच्या विविध जाती आढळतात. यातील मुख्यातः तीन जातींमुळे भारतातील पिकांचं आणि वनस्पतींचं फार नुकसान झालंय. वाळवंटी टोळ, प्रवासी टोळ आणि मुंबई टोळ अशा या टोळांच्या मुख्या तीन जाती आहेत. 

प्रवासी टोळ 
हे युरोप, आफ्रिका, पाकिस्तान, पूर्व आशिया, भारत आणि ऑस्ट्रेलियात आढळतात. भारतात 1954 मध्ये बंगळूरूकडे आणि 1956 मध्ये राजस्थानात व उत्तर गुजरातेत ते आढळले. 1959 नंतर ते फारच तुरळक प्रमाणात होते. 

मुंबई टोळ
हे भारताचा गुजरात, तमिळनाडू पर्यंतचा भाग, श्रीलंका आणि मलेशियात आढळतात. १८३५ ते १९३८ या काळात चार वेळा या टोळांचा प्रादुर्भाव विशेष आढळून आलाय. राजस्थानात 1956 मध्ये आणि मध्यप्रदेशात ते 1960 मध्ये आढळले होते. 

भारताला वाळवंटी टोळाचा जास्त धोका
 
वाळवंटी टोळ भारतात सर्वात जास्त नुकसानकारक आणि नियंत्रण करण्यास सर्वात अवघड आहे. पोर्तुगाल पासून आसामपर्यंत जवळपास ४.१४ कोटी चौरस किलोमिटर प्रदेशातील साठ देशांना या जातीच्या टोळ्यांचा धोका आहे. त्यांचा भारत, दक्षिण पोर्तुगाल, जिब्राल्टर, वायव्य पूर्व आणि ईशान्य आफ्रिका, अरबस्थान, इझराईल, रशिया, इराक, इराण, तुर्कस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांचा अंतर्भाव आहे. यापैकी कुठल्या तरी एका किवा त्यापेक्षा जास्त देशांत दरवर्षी या जातींच्या टोळ्यांमुळे नुकसान होतय. 

Image may contain: plant, flower, nature and outdoor

कसे असतात हे टोळ?
चावण्यायोग्य मुखांगे (तोंडाचे अवयव) असलेले मध्यम लांबीचे हे कीटक असून डोक्याकडील भाग व डोळे मोठे असतात. शृगिकांची (सांधेयुक्त स्पर्शदिृयांची) लांबी शरीराच्या लांबीपेक्षा कमी असते. पंखांच्या दोन जोड्या असतात. पुढील जोडी कठीण व चकचकीत असून त्याखाली मागील पंख असतात. उडण्यासाठी मागील पंखाचा उपयोग होतो. पूर्ण वाढ झालेल्या टोळाचा रंग पिवळा आसतो.

असं असतं टोळधाडीचं चक्र 
टोळांची वाढ काही वर्षात फार मोठ्या संख्येनं होते व ही स्थिती पाच-दहा वर्षे टिकते. नंतर त्यांच्या संख्या वाढिस उतार लागतो. परत काही वर्षांनी त्यांची संख्या वाढू लागते. मध्यंतरीच्या काळात हे टोळ मर्यादित क्षेत्रात थोड्या संख्येने उपस्थित राहतात. एखाद्या अनुकूल वर्षाच्या एकाकी टोळांच्या संख्येत वाढ होते व ते इतरस्त विखुरलेले असतात. पुढील वर्षात अवर्षणामुळे मुबलक अन्नाचे क्षेत्र कमी झाले तर हे टोळ लहानशा क्षेत्रात गर्दी करतात व यातूनच भ्रमण करणाऱ्या टोळांचे थवे निर्माण होतात. हे थवे उत्पत्तीच्या क्षेत्राबाहेरील भागांत उड्डाण करतात आणि तेथील पिकांचं आणि वनस्पतींचं नुकसान करतात. 

टोळधाडी माणसांवर हल्ला करताता का?
टोळांवर मनुष्याने हल्ला केला तरच ते माणसाला (त्याचे कपडे घामाने भिजलेले असल्यास आणि तो झोपेत असल्यास) चावतात.

Image may contain: plant, outdoor and water

टोळधाडीचा नाश कसा होतो?

वाळवंटी टोळाच्या पिल्लांचे थवे त्यांच्या नैसर्गिक शत्रूंच्या हल्ल्यामुळे, जोराच्या वार्‍यामुळे किंवा मानवी प्रयत्नांमुळे नाश पावतात अथवा त्यांची संख्या कमी होते. उडणाऱ्या टोळांचे  थवे सोसाट्याने वाहनारे धुळीचे लोट, प्रतिकूल हवामान, उत्पत्तीला अयोग्य अशा भूखंडात प्रवेश, समुद्रात बुडून मृत्यू, डोंगराळ भागात अडकून पडणे, नैसर्गिक शत्रूंचा हल्ला आणि मानवी प्रयत्नांनी नाश पावतात.

महाभयान टोळधाडीवर नियंत्रण कसं मिळवायचं?
शेकडो वर्षापासून मनुष्य टोळधाडिंचा प्रतिकार करतोय. फार पुरातन काळी टोळांपासून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून ईश्वराची प्रार्थना करीत असत. त्यानंतर निरनिराळ्या उपायांचा अवलंब करण्यात येऊ लागला. यात जमीन नांगरुन टोळांच्या अंड्यांचा नाश करणं. त्यांची पिल्लं गोळा करून अथवा चर खणून त्यात पाणी भरून ती मारणं, धूर करून किंवा जळत्या मशालींच्या साह्याने टोळांचा नाश करणं, टोळधाड पिकावर उतरू नये म्हणून पत्र्याचे डबे वाजवणं, पांढरी फडकी हवेत हलविणं, या सर्व उपायांनी टोळधाडीवर नियंत्रण मिळविता येतं. 

सूर्यास्तपासून सूर्योदयापर्यंत टोळ शांत राहतात. अशावेळी झाडूच्या साह्याने त्यांना गोळा करून मारणं सोपं असतं. आधुनिक कीटकनाशकांचा शोध लागल्यापासून टोळधाडीच्या नियंत्रणात क्रांती झाली आहे. 
बीएचसी, आॅल्ड्रीन आणि डिलड्रीन यांचा याकामी विशेष वापर करण्यात येतो. हेप्टॅक्लोअर आण पॅराथिऑन ही कीटकनाशकेही परिणामकारक असल्याचे आढळून आलंय. त्यामुळं टोळांच्या उडणाऱ्या थांव्यांवर दिवसा आणि विश्रांती घेणाऱ्या थव्यांवर रात्री विमानातून औषधांचा फवारा मारून टोळधाडीचं जास्त परिणामकारक नियंत्रण करणं शक्‍य आहे. टोळधाडीचं नियंत्रण ही शासनाची जबाबदारी असून त्याचा कोणताही खर्च शेतकऱ्यांकडून वसूल केला जात नाही. 

टोळांचे नैसर्गिक शत्रू
सर्कोफॅजिडी कुळातील माशा टोळांच्या शरीरावर उड्डाणांच्या अवस्थेत आळ्या सोडतात आणि त्यांच्या शरीरात घुसून आपली उपजीविका करतात. हिंगे त्याची अंडी खातात. कॅरिबिडी कुलातील भुंगिऱ्यांचे डिंभक रात्रीच्यावेळी टोळांना खातात. उंदीर, खारी सारखे कुरतडणारे प्राणी, अनेक प्रकारचे पक्षी, साप, सरडे, पालींसह विविध प्रकारचे रोग टोळांचे नैसर्गिक शत्रू आहेत.

 

-धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High alert to India over probable locust attack