विजय मल्या भारतात कधी परतणार? 

विजय मल्या भारतात कधी परतणार? 

मुंबई - विजय मल्या भारतात कधी परतणार? आणि कायदेशीर सुनावणीला कधी सामोरे जाणार? असा प्रश्‍न उच्च न्यायालयाने उपस्थित केला. फरार आर्थिक गुन्हेगार (फ्युगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेन्डर ऍक्‍ट - एफईओए) या कायद्यानुसार विजय मल्याला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयाने 5 जानेवारीला फरार घोषित केले आहे. त्या निर्णयाविरोधात मल्याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्या. इंद्रजित मोहंती आणि न्या. सारंग कोटवाल यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. 

मल्या यांना भारतात येण्याची इच्छा आहे; पण ब्रिटिश न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांना परवानगीशिवाय ब्रिटन सोडता येणार नाही, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. मल्याला फरार घोषित करणे आणि एफईओएअंतर्गत त्यांची मालमत्ता जप्त केल्याने त्यांना कर्ज देणाऱ्यांचेच नुकसान होणार आहे, असा युक्तिवाद मल्याच्यावतीने वकील अमित देसाई यांनी केला. बॅंकांकडून घेतलेले कर्ज परत करण्याची तयारी मल्या यांनी दाखविली आहे, असेही त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनाला आणून दिले. त्यामुळे मल्या यांना फरार घोषित करणे दुराग्रही आहे, असा दावाही देसाई यांनी केला. मल्या भारतात परत आले आणि सुनावणीला उपस्थित झाले की, हा ठपका आपोआपच हटेल, नव्या कायद्यान्वये त्यांची जप्त केलेली मालमत्ताही सोडविली जाईल. त्यामुळे मल्या कधी परतणार, हे सांगा असे खंडपीठाने म्हटले. 

ईडीने वेळ मागितला 
ब्रिटिश न्यायालयासमोर मल्या यांनी, मला भारतात परतायचे आहे. तेथील न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे सांगितले आहे का? असा प्रश्‍न न्यायाधीशांनी मल्याच्या वकिलांना केला. दरम्यान, मल्याने केलेल्या या अर्जावर ईडीला उत्तर सादर करण्यासाठी वेळ हवा आहे, अशी विनंती वकील हितेन वेणेगावकर यांनी केल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी 13 मार्चपर्यंत तहकूब केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com