बनावट नोटा जमा करणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा 

बनावट नोटा जमा करणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा 

मुंबई - केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर बॅंक खात्यात पाच बनावट नोटा जमा करणाऱ्या महिलेच्या विरोधातील गुन्हा उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. नाशिक येथील चलार्थपत्र मुद्रणालयाच्या (करन्सी नोट प्रेस-सीएनपी) व्यवस्थापकाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर न्यायालयाने हा आदेश दिला. 

विक्रोळीतील रहिवासी असलेल्या महिलेच्या विरोधात बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी बॅंकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी वकील जतीन शहा यांनी तिच्या वतीने फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर तिने तीन हप्त्यांत 92 हजार रुपये बॅंकेत जमा केले होते. बॅंकेत 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांची छाननी होते. सुरुवातीला दोन वेळेस तिच्या नोटा स्वीकारण्यात आल्या; मात्र तिसऱ्या वेळी तिने 40 हजार 500 रुपये जमा करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बनावट असल्याने स्वीकारण्यास मशिनने नकार दिला. त्यानंतर बॅंक व्यवस्थापकाने विक्रोळी पार्कसाईट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास अधिकाऱ्यांनी सीएनपीकडून या नोटांबाबत अहवाल मागवला होता. या नोटा बनावट असल्याचे ओळखणे सामान्य नागरिकांना अशक्‍य आहे. त्यामुळे ग्राहकांकडून अशा नोटा स्वीकारल्या जातात, असे अहवालात नमूद होते. त्यामुळे पुराव्याअभावी या महिलेची सुटका होऊ शकते, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. यावर खंडपीठाने संबंधित महिलेला दिलासा देत तिच्या विरोधातील गुन्हा रद्द केला. 

फरक ओळखणे कठीण  
खऱ्या आणि खोट्या नोटा ओळखणे सामान्य नागरिकांना अशक्‍य असते. अशा नोटांतील फरक साध्या डोळ्यांनी ओळखता येत नाही. खऱ्या आणि बनावट नोटांमधील फरक बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्यातील (2012) तिसऱ्या तक्‍त्यात नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com