कोमातील पतीची मालमत्ता विकण्यास उच्च न्यायालयाची परवानगी 

कोमातील पतीची मालमत्ता विकण्यास उच्च न्यायालयाची परवानगी 

मुंबई - सहा वर्षांपासून कोमात असलेल्या पतीचे घर आणि गाळा विकण्याची परवानगी उच्च न्यायालयाने पत्नीला दिली आहे. त्यासाठी पतीचे पालकत्व स्वीकारावे आणि काही रक्कम मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात जमा करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने पत्नीला दिले.

मेंदूतील रक्तस्रावामुळे डॉ. विजयकुमार गुप्ता २०१३ पासून कोमात आहेत. डॉ. गुप्ता, त्यांच्या पत्नी डॉ. मधू गुप्ता आणि दोन मुले अशा परिवाराचे वास्तव्य ३२५ चौरस फुटांच्या घरात आहे. डॉ. गुप्ता यांच्यावरील उपचारांसाठी ही जागा अपुरी असल्यामुळे त्यांच्या नावे असलेले दहिसर येथील येथील घर आणि भाईंदर येथील ३६० चौरस फुटांचा गाळा विकण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका डॉ. मधू यांनी उच्च न्यायालयात केली होती. 

या याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्या वेळी उच्च न्यायालयाने नायर रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्टकडून डॉ. गुप्ता यांची तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार डॉक्‍टरांनी अहवाल सादर केला असून, डॉ. गुप्ता यांच्या उपचारांसाठी स्वतंत्र खोलीची आवश्‍यकता असल्याचे नमूद केले आहे. खंडपीठाने हा अहवाल ग्राह्य धरला आणि डॉ. मधू यांना पतीची मालमत्ता विकण्याची परवानगी दिली.

सहा वर्षांपासून कोमात असलेल्या पतीची मालमत्ता विकण्याचे पत्नीला पूर्ण अधिकार आहेत, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. विक्री व्यवहाराची कागदपत्रे न्यायालयात जमा करावीत, असे आदेशही खंडपीठाने दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com