राज्यात उन्हाचा चटका कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे - राज्यात उन्हाचा चटका कायम असून, शहरात पुढील दोन दिवसांमध्ये तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केली. संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. पुण्यात 39. 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 42. 6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

राज्यात सर्वच भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील कमाल तापमानात 3.1 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. हवामान खात्याने विदर्भातील दहा प्रमुख शहरांच्या कमाल तापमानाची नोंद केली आहे. त्यापैकी सात शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला आहे. पश्‍चिम राजस्थान, गुजरात आणि रॉयलसीमा या भागातही तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. 

कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

लोहगाव 40.5 अंश सेल्सिअस 
मध्य महाराष्ट्रातील नगर, सांगली, सोलापूर या शहरांबरोबरच लोहगाव येथे 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा 2.5 अंश सेल्सिअसने तापमान वाढले. शिवाजीनगर भागातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा दोनने वाढून 39.6 अंश सेल्सिअस नोंदला गेला. शिवाजीनगर येथील रात्रीचे तापमान 1.8 अंश सेल्सिअसने कमी होऊन 18.1 अंश नोंदले गेले. लोहगाव येथे किमान तापमान 21.2 अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. 

का वाढतोय पारा? 
मराठवाडा आणि कर्नाटकाच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वातावरणात दमटपणा आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तापमानात किंचित वाढ झाली आहे. तसेच, राजस्थानवरून उष्ण आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्याचा परिणामही तापमान वाढण्यात होत आहे. 

Web Title: High temperature in maharashtra