विदर्भ 'तापला'; जगातील सर्वांत उष्ण शहरांमध्ये सहा शहरांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 एप्रिल 2019

जगातल्या सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये विदर्भातील तब्बल सहा शहरांचा समावेश.

मुंबई : मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात सुर्य आग ओकत आहे. त्यातही विदर्भात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये विदर्भातील तब्बल सहा शहरांचा समावेश असल्याचे 'इआय डोरॅडो' हवामानाचा अभ्यास करणाऱ्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावरून वाढत्या तापमानाची दाहकता समजू शकते. उकाड्यामुळे नागरिक हैरान झाले असून, अकोला शहरामध्ये उष्मघाताने एका नागरिकाला आपला जीव सुद्धा गमवावा लागला. मागील आठवडाभरात राज्यातील तापमान 39 अंशावरून 45 अंशापर्यंत पोहचले आहे. अकोला हे जगातील 2 क्रमांकाचे तर ब्रम्हपुरी 3 क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहरे आहेत.

हवामानशास्त्र विभागातील आकडेवारी नुसार आज अकोला 47.06, अमरावती 46, वर्धा 46, नागपूर 45.3, चंद्रपूर 46.5 तापमानाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. 8 मे पर्यंत उष्णतेची लाट अशीच राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे. विदर्भासोबत मध्य प्रदेशातील दोन शहर, उत्तर प्रदेशातील आणि तेलंगणातील प्रत्येकी एक अशा शहरांचाही उष्ण शहरांमध्ये समावेश आहे. 

जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमधील विदर्भातील शहरांचे क्रमांक
अकोला 2, ब्रम्हपुरी 3, वर्धा 5, चंद्रपूर 6, अमरावती 7, नागपूर 8

उन्हाळ्यात घ्यावयची काळजी
- शक्यतो खादीचे, सैम्य किंवा पांढऱ्या रंगाचे, सैल कपड्यांचा वापर करावा.
- पाण्यासोबतच लिंबू पाणी, ताक, ओआरएस आदी द्रव्य पदार्थ प्यावेत.
- प्रवास करताना सोबत पाणी घेणे जरुरीचे आहे.
- घरातून बाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट, चप्पलांचा वापर करा.
- घराबाहेर असताना संपुर्ण शरिर झाकले जाईल अशा कपड्यांचा वापर करा.
- आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
- अशक्तपणा, थकवा जाणवत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या
- ओआरएस, घरची लस्सी,  लिंबु पाणी, ताक इत्यादी घ्या.
- शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळात उन्हात फिरु नका
- शरिरातील उष्णता आणखी वाढेल असे पदार्थ घेऊ नये. उदा : मद्यसेवन, चहा, कॉफी आदी.
- उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Temperature in Vidarbha Region 6 Cities are Included