महाराष्ट्र होरपळतोय! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

 रणरणत्या उन्हाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे. हवामान खात्यातर्फे राज्यात नोंदल्या गेलेल्या 30 पैकी 22 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने गुरुवारी चाळिशी ओलांडली. राज्यात अकोला येथे उच्चांकी कमाल तापमान (46.3 अंश सेल्सिअस) नोंदले गेले.

बावीस शहरांत पारा चाळिशी पार 
पुणे - रणरणत्या उन्हाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे. हवामान खात्यातर्फे राज्यात नोंदल्या गेलेल्या 30 पैकी 22 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने गुरुवारी चाळिशी ओलांडली. राज्यात अकोला येथे उच्चांकी कमाल तापमान (46.3 अंश सेल्सिअस) नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

राज्यात उन्हाच्या चटका सातत्याने वाढत आहे. कोकण किनारपट्टीचे मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, भिरा, डहाणू आणि मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर वगळता राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरीपेक्षा जास्त उसळी मारली होती. विदर्भात उष्णतेची लाट असल्याने तेथे कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदले जात आहे. अकोला येथे सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 

मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकाचा दक्षिण भाग या दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याचा परिणाम विदर्भातील हवामानावर झाला आहे. त्यामुळे कमाल तापमानात पुन्हा कमालीची वाढ झाली आहे. 

मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा हवामान कोरडे झाले आहे. त्यातच कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. 

कमी दाबाचे क्षेत्र तयार ः 
सध्या बंगालच्या उपसागरात व श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्रात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्र तयार झाले आहे. या क्षेत्राची तीव्रता उद्या वाढणार आहे. तर रविवारी या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्‍यता असून, तमिळनाडूकडे सरकेल. त्यामुळे या भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

कोकणात अवकाळीची शक्‍यता 
दक्षिण मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कर्नाटक या दरम्यान समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. तसेच अरबी समुद्राकडून येत असलेले बाष्प यामुळे कोकणात येत्या रविवारी (ता. 28) आणि सोमवारी (ता. 29) तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

तापमानाची चाळिशी ओलांडलेली शहरे (सर्व आकडे अंश सेल्सिअस, कंसात सरासरीपेक्षा वाढलेले तापमान) 
पुणे 41.6 (3.6), 
नगर 43.4 (4.1) 
जळगाव 43 (1.1) 
कोल्हापूर 40.7 (1.3), 
मालेगाव 42.2 (2.3) 
नाशिक 40.5 (2.3) 
सांगली 41.2 (2.4) 
सातारा 40.4 (3.2) 
सोलापूर 42.8 (2.4), 
औरंगाबाद 42.5 (3.4) 
परभणी 45 (3.9) 
उस्मानाबाद 42.1 (3) 
अकोला 46.3 (4.8) 
अमरावती 45 (3.5) 
बुलडाणा 42.5 (4.6) 
ब्रह्मपुरी 45.5 (4.5) 
चंद्रपूर 45.4 (3.2) 
गोंदिया 39.8 (-1.2) 
नागपूर 44.3 (3.2) 
वर्धा 45.5 (4) 
वाशीम 43.8 
यवतमाळ 44.5 (3.8) 

Web Title: Highest maximum temperature in Akola