यंदा सोयाबीनची सर्वाधिक पेरणी; ई पीक पाहणी अहवाल प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soybean

यंदा सोयाबीनची सर्वाधिक पेरणी; ई पीक पाहणी अहवाल प्रसिद्ध

पुणे : राज्यात सर्वाधिक सोयाबीनचे पीक घेत जात असल्याचे ई पीक पाहणी अहवालावरून समोर आले आहे. तर त्याचा खालोखाल व्हाइट गोल्ड (कापूस) आणि भाताचे क्षेत्र अधिक असल्याचे दिसून आले आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना पिकांची नोंद आता मोबाईल ॲपद्वारे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागील अडीच महिन्यात राज्यातील ५८ लाख ३९ हजार शेतकऱ्यांनी या ॲपमध्ये पिकांची माहिती फोटोसह नोंदविली आहे. ई पीक पाहणी ॲपमध्ये नोंदविलेल्या माहितीचे विश्‍लेषण करण्यात आले असून त्यांचे प्रकाशन नुकतेच झालेल्या महसूल परिषदेत करण्यात आले. त्यामध्ये राज्यात सर्वाधिक पीक हे सोयाबीनचे घेतले जात असल्याचे समोर आले. सोयाबीनचे क्षेत्र २४ लाख ३४ हजार हेक्‍टर आहे. त्याखालोखाल १५ लाख ९४ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड होत आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भात हे पीक असून त्याचे क्षेत्र ९ लाख ३९ हजार इतके आहे. राज्यात पहिल्यादांच लागवडीखालील क्षेत्र, त्यामधील पिके यांची अचूक माहिती या विश्‍लेषणनातून उपलब्ध झाली आहे.

ग्रामीण भागात गावपातळीवर जमिनीचे महसुली लेखे ठेवण्याकरिता सातबारा उताराचा वापर केला जातो. सातबारामध्ये गाव नमुना नं.७ हा ‘अधिकार अभिलेख’ विषयक असून गाव नमुना नं १२ हा ‘पिकांची नोंदवही’ ठेवण्यासंदर्भात आहे. आतापर्यंत गाव नमुना नंबर १२ मधील पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी यांच्याकडून घेतल्या जात होत्या. तर संबंधित तलाठी हे पीक पेरणी अहवालावरून या नोंदी नमूद करीत होते. मात्र अनेक वर्षांपासून सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदी अद्ययावत केली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर भूमि अभिलेख विभागाने हे ॲप विकसित केले. त्यामुळे शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन ई पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे फोटो अपलोड करत आहे. या मोबाईल ऍपमध्ये अक्षांश व रेखांशची नोंद होणार असल्याने शेताचे स्थानही समजत आहे. तलाठ्यांकडून या फोटो व स्थानाची पडताळणी केली जाते.

पिकांची होतेय वर्गवारी

ई पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करत असल्याने ॲपवर पिकांची वर्गवारी करण्यात आली आहे. असे एकूण १८ वर्ग करण्यात आले आहे. कडधान्ये, तृणधान्ये, पॉलिहाऊसमधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. तसेच या ॲपमध्ये ५८० पिकांची नोंदी घेता येत आहेत. आतापर्यंत २५० नवीन पिकांची नोंद घेण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे ऊस पिकाचे असून जिल्ह्यात ५७ हजार ५०१ हेक्‍टरवर ऊस आहे. त्यानंतर भात पीक घेतले जात असून त्याचे क्षेत्र १६ हजार ९७५ हेक्‍टर आहे.

loading image
go to top