उन्हाच्या चटक्‍यांनी राज्यभर होरपळ

उन्हाच्या चटक्‍यांनी राज्यभर होरपळ

पुणे - सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी होरपळला. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी उन्हाच्या चटक्‍याची दाहकता वाढली असून, राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४६.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यातील सात शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला. विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येणार असून, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही ही लाट पसरणार आहे, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. 

देशात यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा आतापर्यंतचा उच्चांक अकोल्यात झाला आहे. हवामान खात्यातर्फे राज्यातील ३२ शहरांमध्ये मोजल्या गेलेल्या कमाल तापमानात २५ ठिकाणी कमाल तापमान चाळिशीच्या वर नोंदले गेले. त्या पैकी सात ठिकाणी कमाल तापमानाच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उसळी मारली होती. पुण्यात कमाल तापमानाचा पारा ४२.६ अंश सेल्सिअस नोंदला गेला. 

मध्य प्रदेश ते कर्नाटक दरम्यान दीड किलोमीटर उंचीवर कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तसेच मालदीव ते मध्य महाराष्ट्र, मराठवाडा ते दक्षिण कर्नाटक, तेलंगणा ते दक्षिण तमिळनाडू या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. उत्तरेकडील राजस्थानच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम हवामानावर झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, नागालॅण्ड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, चंडीगड, दिल्ली, पश्‍चिम बंगाल, हिमाचल प्रदेश यासह महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची लाट आली आहे. कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. 

उष्णतेची लाट दोन ते तीन दिवस राहणार 
राज्यात कोरडे हवामान असले तरी मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याशिवाय अरबी समुद्राकडून येत असलेले बाष्प यामुळे कोकणात तुरळक ठिकाणी येत्या रविवारी, सोमवारी अवकाळी पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात अजून दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

‘‘राज्यात पुढील दोन दिवस कडक उन्हाळा रहाणार आहे. त्यानंतर तो कमी होईल. दक्षिणेत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातून हे तापमान वाढले जात आहे,’’
डॉ. ए. के. श्रीवास्तव, हवामान शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग. 

चक्रीवादळ धडकण्याची शक्‍यता 
बंगालच्या उपसागरात व हिंदी महासागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्राचे रूपांतर उद्या (ता. २७) चक्राकार वाऱ्यांमध्ये होण्याची शक्‍यता आहे. हे चक्रीवादळ चेन्नईपासून १४९० किलोमीटर, मच्छलीपट्टणनमपासून १७६० किलोमीटर अंतरावर असेल. त्यानंतर हे चक्रीवादळ तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकणार असून ते मंगळवारी (ता. ३०) दक्षिण भारताच्या किनारपट्टीला धडकण्याच्या शक्‍यतेमुळे जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com