टेकड्यांवर 'थर्टी फर्स्ट'? सावधान!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे - 'थर्टी फर्स्ट'च्या पार्टीच प्लॅनिंग करताय? याचं उत्तर "हो' असेल तर या प्लॅनिंगमधून तुम्ही सिंहगड, तळजाई, हनुमान टेकडी, लोणावळ्याचा घाटमाथा अशी ठिकाणं शक्‍यतो वगळांच! कारण, या भागातील पार्ट्यांवर वनखाते बारकाईने लक्ष तर ठेवणार आहेच, पण मद्यपी असो की शुद्धित शेकोटी पेटवणारे, या सर्वांवर वन कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे. तसेच भारतीय दंड विधानाच्या कलमांनुसार गुन्हे दाखल होणार आहेत.

नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी "थर्टी फर्स्ट'च्या रात्री पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. शहरांमधील हॉटेल्स, उद्याने, एफसी व जेएम रोड, डेक्कन आणि कॅंप असे शहरातील परिसर गर्दीने फुलून जातात. त्याचबरोबर काही हौशी लोक शहरातील जवळच्या टेकड्यांवर जातात. त्यात सिंहगड आणि खडकवासला परिसराला प्राधान्य दिले जाते. त्या पाठोपाठ शहराच्या वन परिक्षेत्रातील तळजाई, भांबुर्डा, हनुमान टेकड्यांचा समावेश असतो.

तसेच, लोणावळा घाटमाथ्यावरही काही जण जातात. अशा ठिकाणी मद्यपान करून "थर्टी फर्स्ट'चे सेलिब्रेशन केले जाते. तेथे रात्री शेकोट्या पेटवल्या जातात, अशा हौशींवर यंदा कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वनांच्या संरक्षणासाठी वन विभाग त्या दिवशी गस्तीवरील सुरक्षारक्षकांची संख्या वाढविणार आहे.

का करणार कारवाई?
"थर्टी फर्स्ट'च्या पार्ट्यांमध्ये मद्यपींकडून गैरप्रकाराचे प्रमाण वाढत आहे. खडकवासला, सिंहगड, पानशेत धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. पार्टी करताना शेकोटी पेटविल्याने, विड्यांची जळती थोटके टाकल्याने वन क्षेत्रात आग लागण्याचा धोका असतो. त्यातून वन संपदा आणि वन्य प्राण्यांच्या जिवाला निर्माण होणाऱ्या धोक्‍याला प्रतिबंध करण्यासाठी ही कारवाई करण्यात येणार येणार आहे.

वनक्षेत्रात "थर्टी फस्ट'च्या रात्री गैरप्रकार होऊ नये, याची प्रकर्षाने काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी या भागावर बारकाईने नजर ठेवली जाईल. पोलिस प्रशासनाचीही मदत घेतली जाणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर वन कायदा आणि भारतीय दंड विधान या दोन्हींच्या आधारावर करवाई केली जाईल.
- महेश भावसार, सहायक उपवनसंरक्षक, पुणे विभाग

Web Title: Hill Thirty First Alert