...ही तर हत्याच; हिंगणघाट जळीतकांडावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे आरोपी विक्की नगराळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राजकीय नेते पीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत आहेत.

पुणे : हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर संपली आहे. सकाळी ६.५५ मिनटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारपासून तिची प्रकृती खालावली. हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेबाबत झालेल्या ह्रदयद्रावक घटनेचे तीव्र पडसाद अवघ्या महाराष्ट्रभर उमटले आहे. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी देखील शर्थीचे प्रयत्न सुरू होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे आरोपी विक्की नगराळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राजकीय नेते पीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त करत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी, अशी विनंती केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत पीडितेला श्रद्धांजली वाहली. तसेच त्यांनी हा मृत्यू नसून ही हत्याच असल्याचे म्हटले आहे.

सुप्रिया म्हणाल्या “हिंगणघाटमध्ये या तरुणीला आरोपीनं जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडितेचा मृत्यू झाला. पण हा मृत्यू नाही, तर हत्या आहे. आरोपीला शिक्षा व्हावी. कारण तातडीनं न्याय मिळतो, हा संदेश जायला हवा,” असं सुळे यांनी म्हटलं आहे.

हिंगणघाटमधील महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या तरुणीला आरोपी विकेश नगराळे यानं पेट्रोल टाकून पेटवून दिलं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. “अतिशय दुःखद..! हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होतेय. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत,” असं सुळे यांनी म्हटलं आहे.

“जलदगतीनं हा खटला चालवण्यात यावा, जेणेकरून तातडीनं न्याय मिळतो हा संदेश जायला हवा. त्याचबरोबर आरोपीलाही जरब बसली पाहिजे. ही घटना अत्यंत दु:खदायक असून, तिच्या कुटंबियांच्या पाठिशी उभं राहणं गरजेचं आहे. अवघ्या २१-२२ वर्षांची ती तरुणी होती. आरोपींनं क्रूर कृत्य केलं आहे,” असंही सुळे म्हणाल्या.

इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया-

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड 

महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर 

“अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. अशा घटना घडल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. समाजाचं बाजारीकरण झाला असून स्त्री वस्तू म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे तीच स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. समाजातील या विकृतीचा नायनाट झाला पाहिजे, या संदर्भात समाज प्रबोधन आवश्यक आहे. पीडित कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे”, हिंगणघाट प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी संतप्त अशी प्रतिक्रिया दिली.

खासदार रामदास तडस

“अतिशय दुःखद घटना! हिंगणघाट घटनेतील पीडित युवतीचा आज सकाळी उपचारादम्यान नागपूर येथे मृत्यु झाला. तिच्या आत्म्याला शांती मिळो व परमेश्वर तिच्या परिवाराला दुःख सहन करण्याची ताकद देवो हीच प्रार्थना..! भावपूर्ण श्रद्धांजली..!”, असं ट्वीट करत खासदार रामदास तडस यांनी पीडितेला श्रद्धांजली वाहिली.

मंत्री नवाब मलिक

“हिंगणघाटची घटना दुर्दैवी, आरोपीवर कडक कारवाई केली जाईल, मंत्रिमंडळात या प्रकरणी चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.

भाजप नेते किरिट सौमय्या

“समाजाने काळजी घ्यायची गरज आहे, सरकारने बोध घेण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरिट सौमय्या यांनी हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूवर दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hinganghat teacher burn death political leaders reactions