
Marathi Bhasha Din : मराठीमधला पहिला शिलालेख कर्नाटकात कसा ? जाणूया महत्त्व मराठी भाषा गौरव दिनाचे
शैलजा अजित निटवे
जाणूया महत्त्व मराठी भाषा गौरव दिनाचे...
'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आज २७ फेब्रुवारी ! मराठी भाषा गौरव दिन ! दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी हा दिन साजरा करण्यात येतो.
कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी ही भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. (history of marathi language )
आपल्या मातृभाषेचा गौरव व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय २१ जाने. इ. स. २०१३ रोजी घेण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांना सारा महाराष्ट्र ओळखतो.
मराठी ही आपली मातृभाषा मराठी भाषा संस्कार करते. हृदय जोडणारा जिव्हाळा, आत्मियता, आपुलकी, माणुसकी हे सारे काही या भाषेमध्ये आहे. मराठीची अमृतमय गंगा शेकडो बोलीभाषांना सामावून घेऊन निरंतर प्रवाही बनली आहे.
ही भाषा हृदयातील भाव सांगते, सहिष्णु मराठी भाषेने देशातील सर्वच भाषेशी भावनिक ऋणानुबंधाचे नाते निर्माण केलेय. मराठी आमच्या आस्मितेचा नाही तर आत्मगौरवाचा, अभिमानाचा विषय आहे. मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला.
मराठी ही भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ १५०० वर्षांचा इतिहास जपणारी अशी ही मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला.
प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली. येथील सहयाद्री, सातपुड्यासारख्या डोंगर. रांगा, गड, किल्ले, दऱ्याखोऱ्यांचा परिसर म्हणजे महाराष्ट्र भूमी !
या भूमीपेक्षाही अधिक राकट, कणखर असा मराठी माणूस ! इ. स. ५०० - ७०० वर्षापासून पूर्ववैदिक, वैदिक संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होते मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके ९०५ मधील असून " श्री चामुंडराय करवियले गंगराज सुत्ताले करवियले" असे आहे.
कर्नाटक मधील श्रवणबेळगोळ येथील विश्व विख्यात श्री भगवान बाहुबली यांची ५८ फूट उंचीची मूर्ती एकाच अखंड पाषाणात कोरली आहे. या मूर्तीच्या पायाजवळ उजवीकडे मराठीत कोरली गेलेली अक्षरे म्हणजे ज्ञात असलेल्यापैकी मराठीतील हा सर्वात पुरातन व पहिला शिलालेख ! याचा अर्थ चामुंडराय याने भगवान बाहुबली यांचा पुतळा उभा केला. गंग राजाने त्या भक्तीचे कुम्पण उभारले.
गमतीची गोष्ट म्हणजे १० व्या शतकात श्रवण बेळगोळ हे गाव पूर्णपणे कन्नड भाषिक परिसरात बसले होते आणि आहे. तेथून मराठी बोलणारा परिसरही त्याकाळी दूर होता आणि आजही आहे. मग प्रश्न येतो की हा शिलालेख मराठीत का लिहिला गेला असावा ?
इतिहासकारांच्या मते त्याकाळी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्येने अधिक असणारा जैन धर्मीय समाज या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येत होता. व तेथे आल्यावर त्या मूर्तीविषयी विचारणा करत असे. त्यामुळेच या शिलालेखाचा १० व्या शतकात जन्म झाला असावा.
विशेष म्हणजे हा पहिला शिलालेख आजही सुस्थितीत उपलब्ध आहे. त्यानंतर ११०० वर्षापासून चालत आलेल्या या मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मुकुंदराज व नानेश्वर यांनी सांगितली. शके १११० मध्ये मुकुंदराजानी रचलेला विवेकसिंधु हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे.
ज्ञानेश्वरांनी 'परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन' अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा वर्णिला आहे. त्याचप्रमाणे चक्रधरस्वामींचा 'लीळाचरित्र' म्हणजे मराठीतील पहिला चरित्रग्रंथ होय.
चक्रधरस्वामीनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांता वरून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य व गोडवा दिसून येतो. संत एकनाथांनी 'भागवत' ग्रंथांची रचना करून मराठीत भर घातली. त्यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे १३ व्या शतकातील मराठी भाषा आजही वाचकाला तितकीच आपलीशी वाटते.
कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेल्या निरनिराळ्या सत्ता होय.
१२५० ते १३५० या काळातील यादवी सत्ता, १६०० ते १७०० या काळातील शिवरायांची सत्ता, १७०० ते १८१८ पर्यंत पेशवाई सत्ता आणि १८१८ पासून इंग्रजी सत्ता. यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात.
काळाप्रमाणेच स्थळानुसार मराठी भाषा बदलत गेली. यातूनच मुख्य मराठी. अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वऱ्हाडी मराठी, कोट मराठी असे पोटप्रकार पडत गेले. कोल्हापुरी शिवछत्रपतीच्या काळात फारशी भाषेचा प्रभाव मराठीवर झालेला दिसून येतो.
त्या काळात राजकीय पत्रव्यवहार. बखरी लिहिण्यासाठी मराठीचा वापर केलेला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात मराठी भाषेची बदललेली शैली दिसून येते.
'पेशवेकाळातील मराठीवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते. या कालखंडात संस्कृत काव्याचे अनुकरण करणाऱ्या पंडिती कविता लिहिल्या गेल्या. रघुनाथ पंडित यांनी रामदास वर्णन. गजेंद्र मोक्ष, दमयंती स्वयंवर अशी अजरामर काव्ये लिहिली.
यानंतरच्या काळात लोकजीवनाशी व लोककलांशी जवळीक साधणारी शाहिरी कविता आकाराला आली. भक्ती पासून ते शृंगारापर्यंतचे अनेक अनुभव खास मराठमोळ्या शैलीत साकार करणाऱ्या शाहिरांच्या कविता म्हणजेच 'पोवाडा' हा प्रकार लोकप्रिय झाला पोवाडा हे मराठी कवितेचे भूषण आहे
यानंतर पेशवाईच्या अस्ताबरोबरच मराठी भाषेची संरचना काही प्रमाणात बदलली. इंग्रजांनी महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळे इंग्रजी साहित्याच्या प्रभावाने निबंध, * कादंबरी, लघुकथा, शोकात्मिका असे नवे साहित्य प्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले.
"केशवसुत' हे आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते. आधुनिक कवितेत कवींच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या भावनांचा अविष्कार दिसून येतो. कवीचे भोवतालच्या जीवनाशी असलेले संबंध ही महत्वाचे ठरत असल्याने सामाजिक जाणिवेने मराठी कवितेला नवे वळण देण्याचे कार्य मर्ढेकरांच्या कवितेने १९४० - ४५ च्या काळात केले.
मराठी भाषेतील पद्य व गद्य साहित्य हे भाषेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणामुळे साकार झाले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत शब्दभंडार उपलब्ध करून दिले. महात्मा फुले यांचा 'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो.
यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकऱ्यांचे झालेले हाल नवीन शैलीने रेखाटले आहे. त्या नंतर वि. वा. शिरवाडकर, प्र के अत्रे, पु.ल.देशपांडे, चिं. वि. जोशी, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर , प्र. , ना. सि. फडके या सारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मनामनातून जागृत ठेवली.
आजही अनेक प्रदेश व विदेशातही मराठी भाषा अभिमानाने बोलली जाते. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांचे स्मरण करुया. त्यांचा जीवनपट आठवूया.
२७ फेब्रुवारी १९१२ रोजी कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते; पण लहान असतानाच काकांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले.
त्यांचे वडील वकील होते. त्यांना सहा भाऊ व कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुम ही घरातील सर्वांची लाडकी होती. एकुलती एक बहीण कुसुम असल्याने त्यांनी कुसुम से अग्रज अर्थात कुसुमाग्रज नाव धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने लिहू लागले.
कुसुमाग्रजांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील पिंपळगाव तालुक्यात झाले व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील महाविद्यालयातून पूर्ण केले.
वीस वर्षांचे असताना त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अहिंसात्मक आंदोलनात प्रवेश केला. या शिवाय आपल्या जीवनात त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
वीस वर्षांच्या वयात त्यांनी आपला पहिला मराठी कविता संग्रह 'जीवनलहरी' प्रकाशित केला. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिणे सुरू केले. धार्मिक चित्रपट 'सती सुलोचना'मध्ये त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले.
नंतर काही काळ नियतकालिके व वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९४२ हे वर्ष त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे होते. याच वर्षी मराठी भाषेचे ध्येयवादी लेखक वि. स. खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचा 'विशाखा' हा कवितासंग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला.
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याची चळवळ सुरू असताना ते 'प्रभात' या दैनिकात काम करायचे. आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार' ही देशाला स्फूर्ती देणारी कविता लिहिली.
या कवितेतून मराठी भाषेतील स्फुल्लिंग ज्वालाप्रमाणे बाहेर पडले. त्यांची ही कविता वाचून इंग्रज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात धाड टाकली. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांची नावे पाहिली तर त्यात कुसुमाग्रज नाव सापडलेच नाही कारण रजिस्टरमध्ये कुसुमाग्रजांचे नाव वि.वा. शिरवाडकर लिहिले होते.
विशाखा' या काव्यसंग्रहानंतर त्यांनी अनेक नाटके कवितासंग्रह, कथासंग्रह लिहिले. त्यांच्या नटसम्राट', 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कारानेही गौरविण्यात आले. 'ज्ञानपीठ पुरस्कार' मिळविणारे मराठी भाषेतील ते दुसरे लेखक होते.
या शिवाय त्यांनी अक्षरबाग, किनारा, मराठी माती, प्रवासी पक्षी श्रावण, जीवन लहरी इ. प्रसिद्ध काव्यसंग्रह लिहिले. मार्च १९९९ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
मराठी भाषेतील एक प्रसिद्ध कवी म्हणून आजही मराठी वाचक आणि रसिकप्रेमी जनतेच्या मनात ते जिवंत आहेत. कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील काव्यात असणारे स्थान कायम अग्रगण्य राहील.
आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने काही
कुसुमाग्रजाना मानाचा मुजरा ! विश्व कल्याणासाठी पसायदान मागणारी जगातील एकमेवाद्वितीय अशी ही आमची मराठी भाषा ! चौदा विद्या चौसष्ट कलांना कवेत घेत आमचे जीवन समृद्ध करणाऱ्या या मराठीचे बाळकडू लाभलेले आम्ही भाग्यवंत !
आपले जीवन आनंदी करणाऱ्या या सुसंस्कृत व संपन्न अशा मराठी भाषेचे आपण ऋणी आहोत. आपणांस मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
म्हणावेसे वाटते
'शेवटी वि. म. कुलकर्णीच्या शब्दात
66 माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट,
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित !"
शैलजा अजित निटवे
Mob : 9922599199