Maharashtra Din : महाराष्ट्राची लाडाची नऊवारी पण धागेदोरे सापडतात थेट हडप्पा संस्कृतीत l History Of Nauwari Saree Maharashtra Din 2023 harappa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Din

Maharashtra Din : महाराष्ट्राची लाडाची नऊवारी पण धागेदोरे सापडतात थेट हडप्पा संस्कृतीत

History Of Nauwari Saree : महाराष्ट्राची नसांगताही ओळख करून देणारी ही नऊवारी साडी असते. स्वतंत्र ओळख निर्माण करणारी हा पेहराव म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची शान आहे. अनेक रणरागिण्यांनी याच साडीला नेसून रण गाजवले आहेत.

भारतात साडीला वेगवेगळ्या प्रांतात निरनिराळी नावं आहेत. प्रदेशानुसार साडीची नावं जशी बदलत गेली, तशी नेसण्याचे प्रकारदेखील बदलत गेले. महाराष्ट्राचं पारंपरिक वस्त्र असलेल्या नऊवारी साडीला लुगडं, धडूतं, धडोत, काष्टा साडी किंवा सकच्छ साडी (कासोटा) असंही म्हणतात. या पारंपरिक नऊवारीचा इतिहासपण खूप जुना आहे.

नऊवार नेसण्याच्या पद्धती

नऊ वार म्हणजे अंदाजे ८.२ मीटर असलेली ही साडी काष्टा किंवा कासोटा पद्धतीनं नेसल्यामुळे, हे लुगडं नेसणारी स्त्री लीलया कुठेही संचार करू शकते. घरात, शेतात आणि अगदी रणांगणावरसुद्धा! सौंदर्य खुलवणारी ही नऊवार साडी वेगवेगळ्या प्रकारे नेसली जाते.

शेतात काम करणाऱ्या स्त्रिया काम करायला सोपं जावं म्हणून घोट्याच्या वर ही साडी नेसतात. ही साडी नेसताना त्या साडीच्या काठाचा ठसठशीत काष्टा केला जातो. शिवाय निऱ्या कमरेला न खोचता त्याचे केळे केले जाते आणि त्या केळ्यात त्या स्त्रिया पैसे किंवा सुपारीच्या डबीसारख्या काही वस्तूही ठेवतात.

अनेक स्त्रियांची घोळदार नऊवारी घोट्यापर्यंत असते. त्या स्त्रिया निऱ्यांचा काही भाग खालून उचलून त्याचा घोळदार ओचा करून कमरेत खोचतात. त्या ओच्यात त्या स्त्रिया पूर्वी ओटी घेत असत. पेशवाई नऊवारी साडीही घोट्यापर्यंत नेसली जाते; पण कधीकधी ओच्याच्या ऐवजी तो भाग ‘झिगझॅग पॅटर्न’ मध्ये खोचला जातो. पूर्वी पेशवाई नऊवारी साडीला ‘गजकी’ असंही म्हटलं जायचं.

शिवाय लावणीतील नर्तिका चापून-चोपून नऊवार नेसतात आणि घुंगरू बांधण्यासाठी पायाकडचा घोळ कमी ठेवतात. त्या स्त्रिया मोठ्या काठाचा सुंदर काष्टा काढून, पदर मोठा घेतात.

समुदकिनारी राहणाऱ्या मच्छिमार महिला पाण्यात साडी भिजू नये म्हणून गुडघ्यापर्यंत घट्ट नऊवारी नेसतात आणि पदर कमरेला खोचतात आणि पदर म्हणून चोळीवर ओढणी घेतात. 

हडप्पा संस्कृतीशी संबंध

५००० वर्षांपूर्वीपासून साडीसदृश, लांबलचक कापड शरीराला वेगवेगळ्या प्रकारे गुंडाळलं जायचं!

हडप्पा संस्कृतीतल्या सापडलेल्या शिल्पांच्या अंगावर स्त्री आणि पुरुषांनी धोतरासारखा दिसणारा पेहराव केलेला दिसतो.

तसंच ‘सांची’ इथल्या शिल्पांवरून त्या काळातल्या स्त्रिया कासोट्यासह लुगडी नेसत असत आणि त्या साडीचाच पदर कंबरेभोवती गुंडाळीत असत असं दिसतं. 

टॅग्स :Day Maharashtrasaree