राज्याच्या दृश्‍यकलेवर समग्र दृष्टिक्षेप 

The history of the state will be revealed
The history of the state will be revealed

मुंबई : महाराष्ट्राच्या कला इतिहासात सध्या दृश्‍यकला परंपरेचा उल्लेख नाही. कारण या संदर्भात माहितीच उपलब्ध नाही. याची दखल घेता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने महाराष्ट्राच्या दृश्‍यात्मक कला परंपरेचा आढावा घेणारा प्रागैतिहासिक ते आधुनिक ग्रंथ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. 

या ग्रंथाचे संपादन ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर करत आहे. सुहास बहुलकर यांनी सांगितले, की या ग्रंथाचे काम सुरू आहे. या ग्रंथाचा कालखंड मोठा असल्याने त्यासाठी आवश्‍यक माहिती संग्रहित करण्यात येत आहे. 

या ग्रंथामध्ये प्रागैतिहासिक काळाचा संदर्भ असलेल्या विदर्भातील अमरावतीजवळील गुंफाचित्रे, चाळीसगावच्या पाटणे गावात सापडलेली हत्यारे, जोर्वे संस्कृती, सातावाहन काळ, अजिंठ्याची 16, 17, 19 क्रमांकाची लेणी, अंबरनाथ, फलटण, खिद्रापूर येथील मंदिरे, यवनी आक्रमणानंतर झालेला विध्वंस यांची माहिती असेल. आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही यांच्या काळातील वास्तू-किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ, पेशवे काळ, शाहू महाराज (सातारा) यांचा काळ यानंतर ब्रिटिशांच्या काळात निर्माण झालेली कला, शिल्प, वास्तू, त्यांचा महाराष्ट्रातील दृश्‍यकलेवर झालेला परिणाम, असे टप्पे या ग्रंथामध्ये अंतर्भूत करण्यात येणार आहेत. 
पेशवाईचा अस्त, 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यानची कला, एतद्देशियांना पाश्‍चिमात्य कला आणि संस्कृतीचे आकर्षण, 1857 मध्ये सर. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌ची स्थापना आणि झालेले परिवर्तन, बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट कला चळवळ, 1936 नंतरचे प्रयोगशील आधुनिक कलाविष्काराचे स्वरूप, स्वातंत्र्योत्तर काळ, 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना, यामधील संक्रमणकाळ, 1960 नंतरचा आधुनिक काळ, 2000 नंतरचा उत्तर आधुनिक काळ आणि त्यातील धक्कादायक प्रयोग असा दृश्‍यकलेतील स्थित्यंतराचा आढावा या ग्रंथात घेण्यात येईल. 

प्रदीर्घ कालखंडाचा सोप्या शब्दांत आढावा, अर्थपूर्ण विवेचन आणि रसग्रहण, दृश्‍यकलेचे भरपूर नमुने आणि छायाचित्रे असे या ग्रंथाचे स्वरूप असणार आहे. दृश्‍यकलेच्या इतिहासात या ग्रंथाचे योगदान मोलाचे ठरेल. येत्या वर्षभरात खंडाचे काम पूर्ण होईल. 
- बाबा भांड, अध्यक्ष, साहित्य संस्कृती मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com