विद्यार्थ्यांच्या नशिबी "पाणीदार दूध' 

दीपा कदम
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबई - राज्यातील अतिरिक्‍त दूध भुकटीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आता शालेय विद्यार्थ्यांच्या गळी कोणतेही पोषकमूल्य नसलेली साडे सात हजार टन स्कीम दूध पावडर उतरवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पोषक आहारासाठी असलेला निधी दूध भुकटी संपवण्यासाठी वापरला जाणार असून विद्यार्थ्यांना पोषकमूल्य असलेले "होल मिल्क पावडर' मात्र देण्याचे शालेय विभागाने टाळले असून पाणीदार दूध पिण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढावणार आहे. 

मुंबई - राज्यातील अतिरिक्‍त दूध भुकटीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आता शालेय विद्यार्थ्यांच्या गळी कोणतेही पोषकमूल्य नसलेली साडे सात हजार टन स्कीम दूध पावडर उतरवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पोषक आहारासाठी असलेला निधी दूध भुकटी संपवण्यासाठी वापरला जाणार असून विद्यार्थ्यांना पोषकमूल्य असलेले "होल मिल्क पावडर' मात्र देण्याचे शालेय विभागाने टाळले असून पाणीदार दूध पिण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढावणार आहे. 

शालेय पोषण आहारात दूध भुकटीचा समावेश करण्यात आला असून पहिली ते आठवीच्या एक कोटी 18 लाख विद्यार्थ्यांना महिन्यातून एकदा दूध भुकटीचे वाटप केले जाणार असून त्यासाठी "दूध भुकटी वाटप दिवस' जाहीर केला जाणार आहे. महिन्यातून एकदा 200 ग्रॅमच्या दूध भुकटीच्या पाकिटाचे विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहे. तीन महिने 600 ग्रॅम दूध भुकटीचे वाटप विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुढील तीन महिने विद्यार्थ्यांना दूध भुकटीचे वाटप केले जाणार आहे. या दूध भुकटीपासून पालकांनी मुलांना घरी दूध तयार करून देणे अपेक्षित आहे. एक ग्लास दुधासाठी साधारण सहा ते सात ग्रॅम दूध पावडर वापरली जाणे अपेक्षित आहे. 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कर्नाटक राज्यातील "क्षीर भाग्य योजने'च्या धर्तीवर शालेय पोषण आहारात दूध भुकटीचा समावेश केला आहे. कर्नाटकमध्ये मात्र "क्षीर भाग्य योजनेत' विद्यार्थ्यांना "होल मिल्क पावडर'चे वाटप केले जाते. तर राज्य सरकारने मात्र स्कीम मिल्क पावडरचे वाटप करण्याचे ठरवत विद्यार्थ्यांना पाण्यासारखे दूध द्यायचे ठरवले आहे. 

राज्यात अतिरिक्‍त दूधावर मार्ग काढण्यासाठी दूध उत्पादकांनी दूध भुकटी तयार करण्यासाठी राज्य सरकारने गेल्याच महिन्यांत अनुदान जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध भुकटीचे दर कोसळल्याने 30 हजार मेट्रिक टनपेक्षाही अधिक दूधभुकटी गोदामात पडून आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांनीच वेगवेगळ्या पद्धतीने आवश्‍यक तेवढी दूध भुकटी खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या महिन्यात घेतला होता. 

राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या 
पहिली ते पाचवी - 71 लाख विद्यार्थी 
सहावी ते आठवी - 47 लाख विद्यार्थी 

स्कीम मिल्क पावडर मोठ्या प्रमाणात पडून असल्याने त्याचाच प्रश्‍न निर्माण झालेला आहे. होल मिल्क पावडर दहा ते बारा वर्षांच्या मुलांसाठी योग्य नाही. त्यामध्ये जास्त फॅट्‌स असल्याने मुलांसाठी स्कीम मिल्क पावडर देणेच अधिक योग्य आहे. 
- प्रकाश खुटवळ, डेअरी उत्पादक 

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कीम दूध पावडरपेक्षा होल दूध पावडर देण्याची गरज असते. मुलांच्या भरणपोषणासाठी दुधातील प्रोटिन्सची आवश्‍यकता असते. स्कीम दूध पावडरमधून दुधातील सर्व पोषकमूल्ये काढलेली असतात. स्कीम मिल्क पावडर मुलांऐवजी वजन कमी करण्याची आवश्‍यकता असणाऱ्या प्रौढांच्या आहारात योग्य असते. 
- डॉ. बेला वर्मा, जे. जे. रुग्णालयातील बाल विभागाच्या प्रमुख 

होल मिल्क पावडरमधील फॅट्‌स - 6 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक 
स्कीम मिल्क पावडरमधील फॅट्‌स - 0 टक्‍के 

Web Title: Hole milk powder to student