NCBच्या अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी? गृहमंत्री म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil

NCBच्या अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी? गृहमंत्री म्हणाले...

समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणात केलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस होती का, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आर्यन खान प्रकरणात पडकलेल्या दोघांविरोधात एनसीबीला समाधानकारक पुरावे मिळाले नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय. त्यानंतर या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कोर्टाच्या आदेशाचा उल्लेख करत या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज बोलून दाखवली. कोर्टाने आरोपींना क्लिन चीट दिली आहे, तर ही कारवाई का करण्यात आली, याची चौकशी केली पाहिजे असं, वळसे पाटील म्हणाले. केंद्रीय एजन्सीचा गैरवापर केला जात असल्याचं आता स्पष्ट झालंय, असं त्यांनी म्हटलं.

यानंतर राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय यंत्रणा यांच्यातील वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर, त्यांनाच चौकशीच्या फेऱ्यात ओढण्याची तयारी राज्य सरकार करतंय का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामध्ये राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे.

हायकोर्टाने या संपूर्ण प्रकरणात एनसीबीच्या तपासावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आर्यन खान प्रकरण म्हणजे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचं कट कारस्थान असल्याचं एनसीबीचं म्हणणं होतं. मात्र, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये असे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं कोर्टाने म्हटलंय. तसेच नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केलेले आरोप हे विचारात घेण्याजोगे असल्याचं कोर्टाने सांगितलं. त्यामुळे वानखेडेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं चित्र आहे.

सध्या आर्यन खान प्रकरणाचा तपास समीन वानखेडे यांच्याकडून काढून एनसीबीच्या एसआयटीकडे देण्यात आला आहे.

loading image
go to top