एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी ‘होप’

एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी ‘होप’

बारामती - आजची तरुणाई किती संवेदनशील आहे, याचा प्रत्यय देणारा एक प्रकल्प येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या बारामती कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारला आहे. बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी हे विद्यार्थी स्वतःच्या पॉकेटमनीतून ‘न्यूट्रिशन’ खरेदी करून पुरवत आहेत. 

बारामती कृषी महाविद्यालयातील कृषी पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयुष्यमान या नावाने एक अभियान सुरू केले असून, त्यासाठी होप फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्या अंतर्गत या विद्यार्थ्यांनी बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये नोंद असलेल्या व एचआयव्हीग्रस्त असलेल्या बालकांना पोषक अन्नद्रव्ये पुरविण्याचा संकल्प केला आहे. 

सध्या हे विद्यार्थी पालकांनी दिलेल्या पॉकेटमनीतून कडधान्ये व पोषक अन्नद्रव्ये खरेदी करीत आहेत. सध्या या मुलांनी त्यांना झेपेल अशा पद्धतीने २० बालकांसाठी हे न्यूट्रिशन्स देण्यास सुरवात केली आहे. या विद्यार्थ्यांपैकी नचिकेत भद्रापूर व स्वप्नील शिरवले यांनी ‘सकाळ’ला या संदर्भात माहिती दिली. 

नचिकेतने सांगितले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज येथे होप फाउंडेशनने या प्रयोगाची सुरवात केली. एचआयव्हीग्रस्त बालकांपैकी जी बालके एकल पालक आहेत. किंवा ज्यांचे आईवडील हयात नाहीत, अशांच्या पोषणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. ती त्यांना मिळाल्यास त्यांची प्रकृती उत्तम राहते. सरकारच्या एआरटी सेंटरमध्ये त्यांना उपयुक्त औषधे मिळतातच, फक्त न्यूट्रीशनची गरज आहे, ती गरज आपण भागवली पाहिजे म्हणून आम्ही एकत्र आलो. यापुढील काळात आहाराबरोबरच   इतरही बाबी करण्याचा विचार आहे. सध्या तरी आम्ही पॉकेटमनीतून हे करतो आहोत. आम्हाला पैशाचीही गरज आहे.’’ 

या प्रकल्पातील सहभागी विद्यार्थी
नचिकेत भद्रापूर, स्वप्नील शिरवले, दिग्विजय भोसले, स्वरूप तर्कसे, वैष्णव गायकवाड, नकुल मिटकरी, भीमसेन पाटील, व्ही. गगन, ऋत्विक शेट्टी, ओमप्रकाश पटणे, अद्वैत पाटील, दिग्विजय अवारी, प्रज्वल पोळ, सर्वेश शिंदे, आकाश रिंगणे, रघू पाटील, प्रणव टकले, अनुज जगताप, इशान महाडिक, श्रेयस डाके, रणजित गवळी. 

हा अत्यंत चांगला व कौतुकास्पद उपक्रम आहे. काही बालकांचे आईवडील हयात नाहीत, अशांसाठी पोषण आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी यात पुढाकार घेतला आहे, हे चांगलेच आहे, या उपक्रमात सातत्य राहावे. सध्या १० बालकांना विद्यार्थ्यांनी न्यूट्रिशन दिले आहे, बालकांची संख्या वाढविण्याचा त्यांचा मनोदय आहे हे चांगले आहे.
- डॉ. चंद्रशेखर टेंगले,  प्रमुख एआरटी सेंटर, बारामती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com