Sant Gadge Baba Birth Anniversary : निरक्षर असलेल्या गाडगे बाबांचे नाव कसे आले अमरावती विद्यापीठाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Gadge Baba Birth Anniversary

Sant Gadge Baba Birth Anniversary : निरक्षर असलेल्या गाडगे बाबांचे नाव कसे आले अमरावती विद्यापीठाला?

Sant Gadge Baba Birth Anniversary : संत गाडगे बाबा हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेंडगाव, अमरावती इथे झिंगराजी राणोजी जाणोरकर अन् आई सखुबाई यांच्या पोटी झाला. ते जातीने धोबी होते अन् यावरून त्यांना खूप हिणवले गेले.

संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये व्यतीत केले. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रुढी, परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.

गाडगे बाबांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झालेला, लहानपणीच आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर ते आपल्या मामाकडे राहायला गेले, तिथे शेतात ते फार कष्ट करायचे, ते स्वतः निरक्षर होते पण त्यांना शिक्षणाचे फार महत्व होते. आपल्या कीर्तनातून ते सतत शिक्षण आणि स्वच्छतेच महत्व पटवून देत होते.

संत गाडगे बाबा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होते, त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सर्वसामान्यांना सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

अमरावती विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र दिनी, 1 मे 1983 रोजी पश्चिम विदर्भातील ग्रामीण लोकसंख्येच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांमध्ये आहे.

सन २००५ मध्ये अवरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले. संत गाडगे बाबा यांचा जन्म अमरावती येथे झालेला, आपल्या कारकिर्दीत त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाच्या गौरवासाठी विद्यापीठाला हे नाव देण्यात आलेले.