गारपीट, अवकाळीची भरपाई किती? सोलापूर जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण; ७ तालुक्यात ४ कोटींचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar
गारपीट, अवकाळीची भरपाई किती? सोलापूर जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण; ७ तालुक्यात ४ कोटींचे नुकसान

गारपीट, अवकाळीची भरपाई किती? सोलापूर जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण; ७ तालुक्यात ४ कोटींचे नुकसान

सोलापूर : मार्च १४ ते १८, या काळात राज्यभरात वादळी वारे, गारपीट व अवकाळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार ६०७ शेतकऱ्यांचे दोन हजार ३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. २७) नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना पाठवला आहे.

जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, सांगोला, मोहोळ हे तालुके व मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) अप्पर तहसील कार्यालयांतर्गत वादळी वारे, गारपीट व अवकाळीने काहीही नुकसान झालेले नाही. त्यासंबंधीची नोंद बाधितांच्या अहवालात आहे. दुसरीकडे माढा तालुक्यातील केवळ एकाच शेतकऱ्याचे दीड एकराचे नुकसान झाल्याचीही नोंद आहे. तर बार्शी तालुक्यातील अवघ्या सात शेतकऱ्यांचेच नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे.

दरम्यान, एकूण बाधितांमध्ये एक हजार ५१२ शेतकऱ्यांच्या ९७२ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यात माळशिरस, करमाळा व पंढरपूर या तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी आहेत. अवकाळीने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना तीन कोटी ९२ लाख ८२ हजार १२५ रुपयांची भरपाई मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या पंचनामा अहवालातून म्हटले आहे. आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधीपर्यंत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकसान भरपाई कोणत्या निकषांनुसार?

राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर या काळात अतिवृष्टी व सततच्या पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषाला बगल देत पूर्वीपेक्षा दुप्पट मदतीचा निर्णय घेतला होता. पण, १४ ते १८ मार्च या काळातील वादळी वारे, गारपीट व अवकाळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत किती मिळणार, हे स्पष्ट झालेले नाही. सोलापूर जिल्ह्यातील बाधितांचे पंचनामे दोन हेक्टरच्या मर्यादेतच करण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिले. त्यामुळे ‘एनडीआरएफ’च्या पूर्वीच्या निकषांप्रमाणेच मदत मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तालुकानिहाय बाधित शेतकरी

  • तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)

  • बार्शी ७ ४.३५

  • द.सोलापूर ३५९ २२७.१०

  • अक्कलकोट ३०६ २९८.८५

  • माढा १ ०.६०

  • करमाळा १०३ ५१.६०

  • पंढरपूर ७०० ५३८.८०

  • माळशिरस २११९ ९०८.६६

  • एकूण ३६०७ २०३१.७६