
Raj Thackrey: राज ठाकरे अचानक भाजपच्या विरोधात कसं बोलू लागले?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा मोठा पराभव केला आहे. काँग्रेसने 224 पैकी 136 जागा जिंकत कर्नाटकात ऐतिहासिक विजयाची मिळवला आहे. या पराभवासह भाजपाला दक्षिणेतील एकमेव राज्यही गमवावं लागलं आहे. तर काँग्रेसच्या हातात 10 वर्षांनी सत्तेच्या चाव्या जनतेने दिल्या आहेत. दरम्यान या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपावर सडकून टीका केली आहे.
"मी एका भाषणात विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो तर सत्ताधारी पक्ष हारत असतो असं म्हटलं होतं. हा स्वभावाचा, वागणुकीचा परिणाम आहे. आपलं कोण वाकडं करु शकतं अशा विचारांचा हा पराभव आहे. जनतेला, कधीही गृहित धरु नये. या निकालातून सर्वांनी हे बोध घेण्यासारखं आहे," अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. कर्नाटकमधील विजय हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिमाण असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.
तर राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर देताना राज ठाकरे यांना लक्ष केलं आहे. आशिष शेलार बोलताना म्हणाले की, राज ठाकरे यांच्या बोलण्याला प्रतिक्रियेला आम्ही महत्व देत नाही. राज ठाकरे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतात असंही आशिष शेलार म्हणाले आहेत. भाजप आणि राज ठाकरे यांच्यातील हे टीका करणं पहिल्यांदाच चर्चेचा विषय ठरलं आहे.
गेल्या काही दिवसामध्ये राज ठाकरे आणि भाजप आगामी निवडणुकांसाठी युती करतील अशा चर्चा सुरू होत्या. भाजप आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठीही चालू होत्या. अशातच आता ही पक्षाला आणि निवडणुकीत मिळालेली हार यावरून राज ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली तर त्या टीकेला शेलार यांनी उत्तर दिलं त्यामुळे भाजप आणि राज ठाकरे यांच्यात काही बिनसलं आहे का अशा चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मिडियावर दिसून येत आहेत.