गौतम नवलखांचा हिज्बुल मुजाहिदीनशी संबंध; पोलिसांचा अहवाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

"हिज्बुल'कडून माओवादी आणि नक्षलवाद्यांना नेहमीच विविध प्रकारे मदत केली जाते, असा सरकारचा आरोप आहे. 

मुंबई - नक्षलवादी आणि माओवादी संघटनांचे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनशी संबंध आहेत, असा आरोप राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. "हिज्बुल'कडून नक्षलवादी आणि माओवादी संघटनांना शस्त्रास्त्रे व स्फोटकांचा पुरवठा केला जातो, असा आरोप करण्यात आला. 

शहरी नक्षलवाद प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने गौतम नवलखा यांच्याविरोधात सुरू असलेल्या युक्तिवादाच्या दुसऱ्या दिवशीही सरकारी वकिलांनी अनेक कागदपत्रांचा उल्लेख केला. रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग या आरोपींच्या लॅपटॉपमधून मिळालेला काही तपशील न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सीलबंद स्वरूपात सरकारच्या वतीने दाखल करण्यात आला. "हिज्बुल'कडून माओवादी आणि नक्षलवाद्यांना नेहमीच विविध प्रकारे मदत केली जाते, असा सरकारचा आरोप आहे. 

इस्लामी संघटनेशी आणि हुरियत कॉन्फरन्सचा म्होरक्‍या सय्यद गिलानी याच्याशी संबंध असलेल्या शकील या व्यक्तीची भेट नवलखा यांनी घेतली होती. त्यामुळे याबाबत त्यांचीही भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगण्यात आले. अभियोग पक्षाकडे "हिज्बुल'चा उल्लेख असलेले पुरावे आहेत. शहरी आणि ग्रामीण नक्षलवाद्यांना घातक कारवायांची जबाबदारी ठरवून देण्यात आली होती, असा दावा सरकारने केला. 

पुणे पोलिसांनी शहरी नक्षलवादाबाबत नवलखा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवलखा यांचे वकील ऍड. युग चौधरी यांनी या आरोपांचे खंडन यापूर्वी केले आहे. नवलखा यांनी सरकारच्या वतीने नक्षलवाद्यांशी सामोपचाराची बोलणी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे या आरोपांत तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Human rights activist Gautam Navlakha related to Hizbul Mujahideen Police report