मी शिवरायांचा मावळा, उडून जाणारा कावळा नव्हे : आठवले

I am Mavala of Shivaji Maharaj not a flying crow says Ramdas Athavale
I am Mavala of Shivaji Maharaj not a flying crow says Ramdas Athavale

मालेगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका समतेची होती. केंद्रातील भाजप शासनाने समतेची भूमिका कायम ठेवली आहे. सर्व समाज घटकांच्या हिताची कामे केली आहेत. मी डॉ. बाबासाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. उडून जाणारा कावळा नाही. 2019 च्या निवडणुकीत भाजप समवेत राहू. या पक्षालाच पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता.९) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

आठवले आज मालेगाव दौऱ्यावर होते. येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत व बाजार समितीतील जाहीर सभेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, दलित सवर्ण ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. हे ऐक्य देशहिताचे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आपली भूमिका आहे. कायदा हा सवर्णांवर अन्याय करणारा नाही, तर दलित, आदिवासींचे संरक्षण करणारा आहे.

जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, मालेगाव महानगर अध्यक्ष भारत चव्हाण, उपाध्यक्ष भारत जगताप, तालुकाध्यक्ष दिलीप अहिरे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक निकम, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर होते.

आठवले म्हणाले, की 2019 च्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांना तीनशेपेक्षा अधिक जागा मिळतील. इंदू मिलच्या जागेवरील डॉ. आंबेडकरांचे साडेतीनशे फूट उंचीचे स्मारक असेल. कायद्याचा गैरवापर होता कामा नये. या कायद्यातील शिक्षेचे प्रमाण अत्यल्प असणे खेदजनक आहे. कायद्यात बदल करण्यापेक्षा आपल्या विचारात बदल करा. सरकार कोणाचेही असो, दलितांवर पिढ्यानपिढ्या अन्याय अत्याचार सुरु आहेत.

जातीयवादी मानसिकता नाहिसी होण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांगासह विविध समाज घटकांसाठी पेन्शन, आर्थिक मदत, दिव्यांगांना साहित्य वाटप असे अनेक स्तुत्य निर्णय घेतले.

आठ हजार शिबिरातून दिव्यांगांना साहित्य वाटप झाले. आघार येथील दौऱ्यात दलित सवर्ण बांधवांनी आम्ही एकोप्याने राहू असे आश्‍वासन दिले आहे. तेथील महिलांना काम नाही. त्यांना काम उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. सामाजिक सलोखा गरजेचा आहे.

निरुपम यांची भूमिका मराठी माणसांचा अवमान करणारी

आगामी निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती व्हावी, अशी आपली इच्छा आहे. युती झाल्यास लोकसभेच्या दोन जागा व न झाल्यास लोकसभेच्या चार जागा रिपब्लिकन पक्षाला हव्यात. देशात कोणाला कोठेही राहण्याचा हक्क संविधानने दिला आहे. काही जण यात राजकारण करीत आहेत. मनसेच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. उत्तर भारतीयांनी काम बंद केले म्हणजे मुंबई बंद ही संजय निरुपम यांची भूमिका मराठी माणसांचा अवमान करणारी आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदाने रहावे, अशी आपली व शासनाचीही भूमिका आहे.

महाराष्ट्र पोलिस अकादमीतील अनुसूचित जातीच्या १५४ तरुणांना त्यांच्या मूळ पदावर पाठविण्यात अाले आहे. यातील २५ तरुण मला भेटले. उच्च न्यायालयाने राज्य शासनाने हा निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असेही आठवले म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com