'ईडी'ला मी अजिबात घाबरत नाही : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 August 2019

ईडीच्या नोटीसा अथवा कारवाईला मी अजिबात घाबरत नाही. ‘ईडीच्या चौकशीच्या बातम्या मी देखील वृत्तपत्रांत वाचल्या आहेत. मला अद्याप कुठलीही नोटीस आलेली नाही आणि मी अशा चौकशीला घाबरतही नाही,’ अशी प्रतिक्रीया राज ठाकरे यानी आज दिली. ईव्हीएम विरोधातील सर्वपक्षिय पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 

मुंबई : ईडीच्या नोटीसा अथवा कारवाईला मी अजिबात घाबरत नाही. ‘ईडीच्या चौकशीच्या बातम्या मी देखील वृत्तपत्रांत वाचल्या आहेत. मला अद्याप कुठलीही नोटीस आलेली नाही आणि मी अशा चौकशीला घाबरतही नाही,’ अशी प्रतिक्रीया राज ठाकरे यानी आज दिली. ईव्हीएम विरोधातील सर्वपक्षिय पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी अजित पवार, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह विविध संस्था व संघठनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी या सर्व विरोधकांकडून करण्यात आली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात 21  ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेलाही या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला बहुमताने निवडून येण्याचा आत्मविश्वास आहे मग त्यासाठी ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटची गरज नाही. त्यामुळे मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी या दोन्ही पक्षांनी मोर्च्यात सहभागी व्हावे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तसेच ज्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेवरून गोंधळ सुरू आहे, अमेरिका स्वत: ईव्हीएमवर मतदान घेत नाही त्या अमेरिकेत आपल्या मतदानाच्या ईव्हीएमचे चीप बनणार असेल, तर लोकांनी विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही ‘ईव्हीएमद्वारे मतदान हवे की मतपत्रिकांद्वारे’ हे जनतेकडूनच जाणून घेणार आहोत, त्यासाठी घराघरांत फॉर्म वाटले जातील. लोकांची मते घेतली जातील, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख आजच्या बैठकीला उपस्थित होते. पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी आम्ही एक फॉर्म काढून ते लोकांकडून भरुन घेणार आहोत. निवडणुका बॅलेटपेपर घेण्यात याव्यात अशा मागण्यांचे फॉर्म सर्वपक्षीय कार्यकर्ते लोकांकडून भरुन घेतील. 21 तारखेला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am not afraid to ED says Raj Thackeray