Pankaja : पंकजा मुंडेंचं पुन्हा अडचणीत टाकणारं विधान; म्हणाल्या, तुमची लेक देशाची पंतप्रधान... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde

Pankaja : पंकजा मुंडेंचं पुन्हा अडचणीत टाकणारं विधान; म्हणाल्या, तुमची लेक देशाची पंतप्रधान...

बीडः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी थेट पंतप्रधानपदाबद्दल भाष्य केलं आहे. त्यांचं हे विधान त्यांना पुन्हा अडचणीमध्ये टाकू शकतं. कारण यापूर्वी मुख्यमंत्रीपदाबद्दलच्या एका चर्चेने त्यांचा पिच्छा पुरवला होता.

'जनतेच्या मनातला मुख्यमंत्री' हे विधान पंकजा मुंडे यांना मागील पाच-सहा वर्षांपासून जोडलं गेलेलं आहे. हे विधान मी केलं नाही, असं त्यांना वारंवार सांगितलं. तरीही ते त्यांच्याशीच जोडलं गेलं. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असं राजकीय जाणकार सांगतात.

हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

आजही असाच प्रकार बीडमध्ये घडला आहे. आता तर त्यांना थेट पंतप्रधानपदाबद्दल भाष्य केल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. बीडच्या परळीतील जलजीवन मिशन कामाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मागच्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. शेजारच्या गावातील लोक म्हणाले, तुम्ही महिला आहात म्हणून तुम्हाला मतं दिली नाही. त्यावर पंकजा पुढे म्हणाल्या की, एक महिला विकास करु शकत नाही का?

'मी जेवढा निधी दिला तेवढा कुठल्या पुरुषाने दिला नसेल, माझ्याकडून कुणाचं नुकसान झालं आहे का? माझ्यात खोट आहे का?' असे प्रश्न उपस्थित करुन त्यांनी थेट पंतप्रधानपदाबद्दल भाष्य केलं.

देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली, तुमची लेक होऊ शकत नाही का? असं म्हणत त्यांनी एकजुटीने साथ देण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या विधानानाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांनी बीड दौरे वाढवले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. २०१९मध्ये भाऊ धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा परळीमधून पराभव केला होता.