साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नको : बोराडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

‘मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ इच्छित नाही,’ असे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. रं. बोराडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद -  ऐन उमेदीच्या काळात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला असता, तर मी मराठी भाषावृद्धीचे काम केले असते. आता मात्र ‘मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ इच्छित नाही,’ असे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. रं. बोराडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष राहिलेल्या प्रा. बोराडे यांना साहित्यविश्‍वात मानाचे स्थान आहे. उस्मानाबाद येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चिले जात होते. पण प्रा. बोराडे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की संमेलनाच्या अध्यक्षाने मराठी भाषा आणि साहित्याच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते. मात्र, आजवर बहुतांश अध्यक्ष फक्त ‘तीन दिवसांचे गणपती’ बनून वावरले.’’

माझ्या ठिकाणी एखादा कुणी असता, तर सासुरवाडीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी धावाधाव केली असती. पण, अशा गोष्टी आपणच थांबविल्या पाहिजेत.
- प्रा. रा. रं. बोराडे, ज्येष्ठ साहित्यिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I do not want to be the president of a literature conference said Borade