मुख्यमंत्री म्हणून मी सक्षम - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री म्हणून मी सक्षम - देवेंद्र फडणवीस

मुंबई - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी केलेल्या केलेल्या सर्व आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सडेतोड उत्तर दिले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकायचे नसतात, असा टोला कॉंग्रेस नेते नारायण राणे यांना लगावतानाच मुख्यमंत्री म्हणून आपण सक्षम आहोत, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. 

कोपर्डी प्रकरणात सरकार संवेदनशील असून, या घटनेतील आरोपींची गय केली जाणार नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हे आणि प्रामुख्याने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. दामिनी पथकाची व्याप्ती वाढविण्याबरोबरच महिला पोलिसांची मोठ्या संख्येने भरती करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

महिला अत्याचाराचे खटले अधिक गतीने पूर्ण होण्यासाठी राज्यात 22 फास्ट ट्रॅक, तर 27 विशेष न्यायालये कार्यरत आहेत. नगरचा खटलाही फास्ट ट्रॅक किंवा पास्को न्यायालयात जलद गतीने चालविण्यात येईल. यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्‍ती करण्यात येईल. तसेच या खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
 

भाजप हा गुंडांचा पक्ष, या राणे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सौम्य भाषेत त्यांना टोमणे लगावले. ते म्हणाले, की राणे यांनी राजकीय भाषण केले. ते अनेक वर्षांनंतर विरोधी भूमिकेत दिसले. राणे यांना गृह खात्याचा चाळीस वर्षांपासूनचा अनुभव आहे. मला मात्र, फारसा अनुभव नसला तरी माझे कामच त्याबद्दल बोलेल. राज्यात मुख्यमंत्री म्हणून मी एकटाच असून सक्षमही आहे. मुख्यमंत्र्यांनी या वेळी राणेंच्या विरोधातील सावंतवाडीतील काही गुन्हे वाचून दाखविले आणि काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकायचे नसतात, असा टोलाही लगावला.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अहमद पटेल, सोनिया गांधी यांच्याबाबत राणे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या होत्या त्या मी सांगणार नाही. कारण त्यांचे मत कालांतराने बदलत असल्याचा अनुभव असल्याने त्यांचे म्हणणे कुणी गांभीर्याने घेत नसल्याचा टोमणाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. मंत्र्यांवर आरोप करताना साप साप म्हणून तुम्ही भुई धोपटली तरी कुणी राजीनामा देणार नाहीत आणि खरेच कोण गुन्हेगार असेल तर एक मिनीटही त्याला मंत्रिमंडळात ठेवणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

परदेशींनी पुण्याचा "डीपी‘ बदलला
औचित्याच्या मुद्‌द्‌याद्वारे नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव प्रवीण परदेशी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. पुण्यातील एका अधिकाऱ्याने आपल्याकडे निवेदन दिले असून, परदेशी यांच्या आदेशानुसार पुण्याचा विकास आराखडा (डीपी) बदलण्यात येत असल्याची माहिती राणे यांनी निवेदन वाचून सांगितली. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासाठी नगररचना संचालक कोप हे काम करत असून भोसले यांच्यासाठी डीपीमध्ये बदल करण्यासाठी परदेशी यांच्याकडून दबाव येत असल्याचे कोप यांचे म्हणणे आहे. भोसले यांच्यासाठी पीएमआरडीएचे आयुक्‍त महेश झगडे आणि महापालिका आयुक्‍त कुणाल कुमार यांच्यावरही दबाव असल्याचे या निवेदनात नमूद केल्याचे राणे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com