सुषमा स्वराज यांची एकदा भेट घडवा ; मायदेशी परतलेल्या फरिदाची हाक

शर्मिला वाळुंज
रविवार, 13 मे 2018

घरकाम, पशू पालनासाठी भारतातून दुबई, कतार, सौदी अरेबी या भागात शेकडो मजुर जातात. दोन वर्षांच्या कंत्राटावर त्यांना ठेवण्यात येते. त्यांचा येण्या-जाण्याचा खर्च ठेकेदार व कंपनी करते. तीन महिन्यातून एकदा घरच्यांची बोलू दिले जाते. कंत्राटपूर्ण होण्याच्या आत काम सोडायचे असल्यास ठेकेदार पैशांची मागणी करतात.

ठाणे : कामाच्या शोधात आखाती देशात गेलेली अंबरनाथ येथील फरिदा खान भारतात सुखरुप परतली. मात्र, आजही आखाती देशातील प्रसंग आठवले की अंगावर काटा येऊन तिच्या डोळ्याच्या कडा पाणवतात. मायदेशीच काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत पुन्हा परदेशी न जाण्याचा निश्चय तिने केला आहे. तसेच तेथे अडकलेल्या पीडीत महिलांसाठी आवाज उठविण्याचा चंगही बांधला आहे. यासाठी फरिदा यांना एकदा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेत त्यांच्याकडे या महिलांच्या सुटकेसाठी प्रयत्न करायचे आहेत.

यामध्ये त्यांच्या सासूही त्यांच्या खांद्याला खांदा लावत असे काम करणाऱयांना शिक्षा आणि पीडित महिलांची सुटका करण्यासाठी आवाज उठविणार असल्याचे सांगतात. याबाबत फरिदा म्हणाल्या, माझ्यावर जे बेतले ते कोणावर बेतू नये एवढीच इच्छा आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील बुवापाडा परिसरात फरिदा अब्दुल अझीझ खान (36 वय) राहतात. पती अब्दुल हे ट्रकचालक आहेत. तर मुलगा माजीद हा शिलाई काम शिकतो. दोन जुळ्या मुली शाहीन आणि जन्नत या शाळेत शिकतात. सासू जैबुननिसा हाॅटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात. हालाखीची परिस्थिती असल्याने फरिदा यांनी कामगार म्हणून आखाती देशात काम करण्याचा निर्णय घेतला. सासू जैबुननिसा या यापूर्वी तीनवेळा परदेशवारी करुन आल्याने त्यांनीही फरिदा यांना कामास जाण्याचा सल्ला दिला. ठेकेदार इमरान याने फरिदा यांना जानेवारीमध्ये कतार येथे नेतो, असे सांगून दुबईमार्गे ओमानला प्रथम नेले.

एका महिलेच्या घरी फरिदाला घरकामास ठेवले. परंतु ही मालकीन फरिदाकडून सकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत बागेतील कामे, पाच ते सहा गाड्या धुणे, 17 ते 18 खोल्यांची साफसफाई करुन घेत असे. त्याबदल्यात एक वेळचे जेवण त्यातही एक चपाती व जॅम देत असे. तसेच काम केले नाही तर मारहाण करीत असे. 

घरच्यांची संपर्क साधण्याची फरिदा यांना परवानगी नव्हती. काम केले तर पैसे मिळतील यासाठी फरिदा यांनी हा अत्याचार महिनाभर सहन केला. त्यानंतर फरिदा यांना मस्कत येथे कार्यालयात नेण्यात आले. तेथे कार्यालयातील महिला कंत्राटदार नशा करुन फरिदा यांच्यासह इतर मजुर महिलांना एका खोलीत कोंडून ठेवत असे. काम केले नाही तर वायरीने मारहाण करीत असे, वीजेचा शाॅक देणे, महिलांचे कपडे काढून मारहाण करीत असे.

तसेच एका रात्री एक मनुष्य आला आणि त्याच्यासोबत तुला कामास जायचे असल्याचे कंत्राटदार महिलेने सांगताच फरिदा यांच्या पायाखालची जमिन सरकली. त्या माणसाने महिलेस पैसे दिल्याने त्या कळून चुकल्या आपल्यासोबत काय होणार आहे. फरिदा यांनी त्या माणसासोबत जाण्यास नकार देताच त्यांना लाथा बुक्कयांनी नाका तोंडातून रक्त येईपर्यंत रोज मारहाण करण्यात येत असल्याचे फरिदा सांगतात.

महिला काम करण्यास नकार देत असल्याने इमरान त्या महिलेस सांगत असे की घरच्यांशी बोलू देऊ नका, जेवायला देऊ नका, मारहाण करा आपोआप कामाला जातील. यामुळे काही महिला घाबरून कामास जाण्यास तयार झाल्या. 

यादरम्यान मी सुमारे 50 ते 60 मजूर महिलांना माझ्या पतीचा नंबर देऊन त्यांना संपर्क साधण्यास सांगितले. परंतू कोणाचाही संपर्क होत नव्हता. अखेर एका मजूर महिलेचा संपर्क झाला आणि तिने माझी परिस्थिती त्यांना सांगितली. अखेर माझ्या घरच्यांनी माझ्याशी संपर्क साधला.

'सावधान इंडिया कोड'ने वाचविले

माझ्या नवऱयाला मी परिस्थिती सांगितली, त्यानंतर त्यांना 'सावधान इंडिया देखो, मेरे साथ वो हो रहा है' असे सांगितले. यावर तेथील लोकांनी मला हे काय आहे असे विचारले असता मी त्यांना तुमची स्तुती करत असल्याचे खोटे सांगितल्याचे फरिदा सांगतात. यावर फरिदा यांची सासू म्हणाली, सावधान इंडिया बोलताच आम्ही समजून गेलो. तिच्यासोबत खूप काही चुकीचे घडत आहे. त्यानंतर अब्दुल यांनी स्थानिक पोलिस मित्र, पोलिस यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या डाॅ. रहाटकर यांच्यामार्फत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. दुबई दुतावासांनीही मदत करत पत्नीची सुखरुप सुटका करण्यास मदत केल्याचे पती अब्दुल सांगतात.

सुटकेसाठी अडीच लाखांची मागणी

घरकाम, पशू पालनासाठी भारतातून दुबई, कतार, सौदी अरेबी या भागात शेकडो मजुर जातात. दोन वर्षांच्या कंत्राटावर त्यांना ठेवण्यात येते. त्यांचा येण्या-जाण्याचा खर्च ठेकेदार व कंपनी करते. तीन महिन्यातून एकदा घरच्यांची बोलू दिले जाते. कंत्राटपूर्ण होण्याच्या आत काम सोडायचे असल्यास ठेकेदार पैशांची मागणी करतात.

स्वखर्चाने माघारी यावे लागते. तसेच काम सोडण्यासाठी फरिदा यांच्याकडे अडीच लाख द्या, नाही तर महिला द्या, अशी मागणी केली गेली. तसेच त्यांच्याकडून 50 हजार घेतले गेले. फरिदाच्या पतीकडून 60 हजार रुपये घेतले गेले. व्याजाने पैसे घेत अब्दुल याने इमरान याला पैसे दिले आहेत.

सुषमा स्वराज यांची भेट घालून द्या...

माझ्यासारख्या अनेक महिला मजूर तेथे अडकल्या आहेत. पंजाब व मद्रास येथून जास्त मजूर महिला तेथे येतात. त्यातील एका महिलेला अर्धांगवायूचा झटका आला आहे. 

तसेच बरकत उर्फ फातमा या पंजाबी महिलेला खूप त्रास दिला जातो. या महिलांची मला सुटका करायची आहे. त्यांच्या पाठीपुढे कोणी नसल्याने त्या तेथील नरकयातना भोगत आहे. यासाठी मला एकदा सुषमा स्वराज यांची भेट घालून द्या.

इमरानला शिक्षा व्हायला हवी

इमरान शेख या दलालाने फसवणूक केली आहे. तसेच इक्बाल याचाही यामध्ये हात आहे. परंतु त्याच्याबाबत जास्त माहिती नाही. इमरान हा पेपरफुटीप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. मात्र, अशीच फसवणूक करुन तो इतर महिलांनाही संकटात टाकू शकतो. त्याला कठोर शिक्षा झाली पाहीजे.

आता मायदेशीच...

कामासाठी आता परदेशी जाणार नाही. नागरिकांना डब्बे देणे, हाॅटेलमध्ये पोळ्या लाटून देणे ही कामे पुन्हा सुरु करणार आहे. कामासाठी बाहेर जाणार नाही, तसेच हा सल्ला इतरांनाही देणार आहे असे फरिदा सांगतात. त्यांच्या या निर्णयाला सासूही होकार देऊन आमच्या घरातील सर्व लोक बाहेरगावी कामासाठी आहेत. परंतू कोणासोबत चुकीचे होत असेल तर त्याला नक्कीच आमचा विरोध असेल.

Web Title: I Want Meet Sushma Swaraj once says farida