
Narhari Zirwal: "आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडं येऊ द्या, मग..."; झिरवळांनी थेटच सांगितलं
राज्यातील सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साधारणपणे 10 ते 15 मे नंतर हा निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा निकाल काय असेल याची राज्यासह देशातील नेत्यांना आणि सामान्यांना उत्सुकता आहे. हा निकाल येण्याआधीच राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. माझ्याकडे त्या 16 आमदारांचं प्रकरण आल्यास मी त्यांना अपात्र करेन, असं नरहरी झिरवळ यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यासह सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून आता सर्व लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागलं आहे. नरहरी झिरवळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न केला की, तुमच्याकडे आमदारांचं प्रकरण आल्यावर काय करणार? त्यावर नरहरी झिरवळ यांनी उत्तर देताना म्हंटलं की, 'येऊ दे तर खरी. आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन, असं नरहरी झिरवळ म्हणालेत.
'विरोधी निकाल लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असं होईल. मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असं म्हणता येईल का? मी दिलेला निर्णय बरोबर आहे', असंही पुढं ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी पूर्ण झाली. तब्बल 9 महिन्यांच्या युक्तिवादानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी ज्येष्ठ सरकारी वकील आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी यासंदर्भात मोठी अपडेट दिली होती.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल केव्हा लागेल, हे आत्ता जरी सांगणे कठीण आहे. परंतु माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठातील काही न्यायमूर्ती निवृत्त होत आहे. त्यापूर्वी हा निकाल लागले. यामुळे सत्ता संघर्षाचा निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली होती.
राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली होती. त्यातील न्यायमूर्ती एम. आर. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे 14 मेच्या आधी हा निकाल लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.