महात्मा गांधींबद्दलचे वादग्रस्त ट्विट निधी चौधरींच्या अंगलट; मुख्यमंत्र्यांकडून कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 जून 2019

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त ट्विट प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांच्या अंगलट आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत चौधरी यांची अखेर बदली केली आहे. 

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त ट्विट प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांच्या अंगलट आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत चौधरी यांची अखेर बदली केली आहे. 

मुंबई महापालिकेच्या विशेष उपायुक्त पदावरून चौधरी यांना हटविण्यात आले असून आता त्यांची बदली मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात करण्यात आली आहे. समाज माध्यमांत या प्रकरणाची उलटसुलट चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदलीची कारवाई केली. तसेच चौधरी यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

निधी चौधरी या 2012 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुंबई महानगरपालिकेच्या विशेष उपायुक्तपदी कार्यरत आहेत. 

ट्विटरवरून आपली बाजू मांडण्याचा चौधरींचा प्रयत्न
नेेटकऱ्यांनी चौधरी यांना ट्विटरवरून लक्ष्य केल्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणानंतर त्यांनी महात्मा गांधीजींबद्दलच्या भावना ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत. 

''लोकांचा गैरसमज निर्माण होत असल्यामुळे मी गांधीजींबाबतचं ट्विट हटवले आहे. मी स्वप्नातही गांधीजींचा अवमान करू शकत नाही. गांधीजींवर माझी खूप श्रद्धा असून गांधीजींची हत्या करणाऱ्याचे मी कधीच समर्थन करू शकत नाही. माझ्या या ट्विटचा वापर राजकीय फायद्यांसाठी केला जात आहे,'' असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IAS Officer Choudhari transfer in Mantralay