esakal | महाराष्ट्रात देवाची ‘बार्शी लाईट’ नावाची रेल्वे होती.. तुम्हाला माहितंय? 'त्या' रेल्वेचा रंजक प्रवास वाचाच ...
sakal

बोलून बातमी शोधा

train

एक देवाची गाडी म्हणजेच बार्शी लाईट असे त्याचे नाव. या गाडीचे नाव बार्शी आहे पण या गाडीचा मिरज ते लातूर असा नॅरोरेल्वेमार्ग आहे. याचा वेग हा संथगतीने असतो. या रेल्वेचे इंजिन कोळश्यावर चालणारे असून त्या रेल्वेला एकूण सात लाकडी डब्बे आहेत. ही रेल्वे गाडी फक्त दहा पंधरा रुपयात जाते. आपल्याला स्टेशनला नेणारी रेल्वेही अक्षरश: देवाचीच गाडी होती. या रेल्वे गाडीची सुरवात एव्हरार्ड कॅलथोर्प या इंग्लिश मनुष्याने केली होती. 

महाराष्ट्रात देवाची ‘बार्शी लाईट’ नावाची रेल्वे होती.. तुम्हाला माहितंय? 'त्या' रेल्वेचा रंजक प्रवास वाचाच ...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखोंनी वारकरी जात असतात. या आषाढी वारीसाठी विठुरायाचे अनेक भक्त गळ्यात माळ, माऊलीचा जप करत अगदी भक्तीमय वातावरणात तल्लीन होवून पंढरपूरला मार्गस्थ होतात. यात कित्येक वारकरी वर्षानुवर्षे न चुकता पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. यावेळी काही वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी पायी प्रवास करतात तर काही वाहनांनी प्रवास करतात. त्यातील एक देवाची गाडी म्हणजेच बार्शी लाईट असे त्याचे नाव. या गाडीचे नाव बार्शी आहे पण या गाडीचा मिरज ते लातूर असा नॅरोरेल्वेमार्ग आहे. याचा वेग हा संथगतीने असतो. या रेल्वेचे इंजिन कोळश्यावर चालणारे असून त्या रेल्वेला एकूण सात लाकडी डब्बे आहेत. ही रेल्वे गाडी फक्त दहा पंधरा रुपयात जाते. आपल्याला स्टेशनला नेणारी रेल्वेही अक्षरश: देवाचीच गाडी होती. या रेल्वे गाडीची सुरवात एव्हरार्ड कॅलथोर्प या इंग्रज व्यक्तिने केली होती. 

एव्हरार्ड कॅलथोर्प यांचा सुरु झालेला प्रवास...

एव्हरार्ड कॅलथोर्प हे इंग्लंडमधील एका शेतकऱ्यांचा मुलगा. अनेकांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं आकर्षण असतंच. त्याचपध्दतीने एव्हरार्ड यांनाही लहानपणापासून रेल्वेचं आकर्षण होतं. या रेल्वेच्या आकर्षणामुळेच ते लंडनमधील रेल्वेत नोकरीला लागले. रेल्वेत काम करतच ते मोठ्या पदावरही पोहचले. दिवसेंदिवस आपल्याला काहीतरी वेगळे करायचे या दृष्टीने ते नेहमीच प्रयत्नशील असायचे. त्यामुळे एकदा त्यांच्या मनात आले आणि ते भारतात आले. ग्रेट इंडियन पेनिन्सुला (GIPR) म्हणजे सध्याची मध्य रेल्वे यात कॅलथोर्प लोकोमोटिव्ह इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झाले.

भारतीय रेल्वेच्या विकासाचा काळ...

भारतीय रेल्वेचा १८८२ हा विकासाचा काळ. यावेळी इंग्रजांनी स्वत:च्या फायद्यासाठी पूर्ण देशभर रेल्वे रुळाचे जाळे पसरवण्यासाठी सुरवात केली. सुरवातीच्या दिवसात भारतीय नागरिक हे भूत असं म्हणून घाबरवत होते आता तेच भारतीय नागरिक रेल्वेने प्रवास करत आहेत. अनेक मोठमोठी शहरं ही रेल्वेमुळे जोडली जात होती. यामुळेच एव्हरार्ड कॅलथोर्प यांचा भारत देशातील अनेक भागात प्रवास सुरु होता. या प्रवासावेळीच एव्हरार्ड यांना भारतीय नागरिकांना समजावून घेण्याची संधी मिळाली. भारतीय नागरिक जास्तीत जास्त देवदर्शन करण्यासाठीच रेल्वेने प्रवास करतात असे एव्हरार्ड यांना अंदाज आला. याचाच विचार करत त्यांना एक कल्पना सुचली. 

अशी पटली GIPR ला कॅलथोर्पची योजना...

एकदा १८८६ ला एव्हरार्ड यांनी GIPR म्हणजे सध्याचे मध्य रेल्वेकडे रजेचा अर्ज केला. या रजेच्या दिवसात त्यांनी खूप विचार केला आणि ज्या ठिकाणी रेल्वेची गरज आहे तिथे दोन मार्ग काढले. एक मार्ग म्हणजे नाशिक जिथे कुंभमेळा भरला जातो. जिथे नेहमीच लाखोंनी भाविक दर्शनासाठी येत असतात. याठिकाणी ट्राम सुरू करण्याची कल्पना कॅलथोर्प यांना सुचली. आणि दुसरा मार्ग म्हणजे मिरज ते लातूरला जोडणारा नॅरोगेजमार्ग याचा विचार केला. या दोन्ही मार्गावर लहान शहरे होती. त्यामुळे येथे रेल्वे येण्याची शक्यता नव्हती. परंतु नॅरोगेजमुळे याचा खर्च कमी येऊन एका छोट्या रेल्वेमुळे सांगली-मिरज-बार्शी-लातूर या व्यापारी पेठांना हे रेल्वे मार्ग जोडली जाणार होती. शिवाय याच मार्गावर असलेल्या पंढरपूरमुळे लाखो लोकांची सोय होणार होती. अशी ही कॅलथोर्पची योजना GIPR ला पटली. कॅलथोर्पने दोन्ही मार्गाचे सर्व्हेक्षण अगदी व्यवस्थित पूर्ण केले.

GIPRने कॅलथोर्प यांना दिली ‘ही’ शेवटची सूचना...

कॅलथोर्पने १८८७ ला बार्शीला रेल्वे सुरू करायची म्हणून ‘बार्शी लाईट’ या नावाने कंपनी रजिस्टर केली. हा रेल्वेमार्ग सुरु व्हावा म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे सरकारकडून परवानगी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु काही दिवसांनी GIPRने कॅलथोर्प यांना शेवटची सूचना दिली की लष्कराच्या भाकऱ्या भाजायचे बंद करा आणि लवकरच सुट्टीवरून परत या नाहीतर सरळ राजीनामा द्या.

कॅलथोर्प यांचे स्वप्न...

कॅलथोर्प यांचे ‘बार्शीचे रेल्वे (बार्शी लाईट)’ हे स्वप्न होते. त्यांनी त्यांच्या सुरु असलेल्या नोकरीवर राजीनामा दिला. त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार व्हावे म्हणून ते स्वत: दिवसरात्र प्रयत्न करत होते. सुरवातीपासून अगदी रेल्वेचे डब्बे कसे असले पाहिजेत. रेल्वेची चाके कशी असावीत. रेल्वे रुळामधील अंतर किती असायला हवेत. या सगळ्या गोष्टींचा कॅलथोर्प यांनी अभ्यास केला. पुर्वी जगामध्ये जिथे कुठे नॅरो गेज रेल्वे होती. तिथे दोन रुळातले अंतर हे दोन फुट होते. जास्तीत जास्त मालवाहतुक करता यावी यासाठी कॅलथोर्पने सर्व अभियांत्रिकी कौशल्य वापरत ते दोन फुट सहा इंच केले व ते त्यात यशस्वी झाले.

अशी सुरु झाली १८९७ ला बार्शी लाईट...

कॅलथोर्प यांना जशी हवी तशी रेल्वे लीड्स फोर्ज कंपनीने बांधून दिली. इंग्लंडमधील लीड्स येथे त्याची टेस्ट देखील झाली. कॅलथोर्पने बार्शी लाईटसाठी जे अभिनव प्रयोग केले त्याचं जगभरात कौतुक झालं. आणि १८९७ ला बार्शी लाईट सुरू झाली. सुरवातीला बार्शी ते कुर्डुवाडी धावणारी ही रेल्वे काही वर्षातच म्हणजे १९२७ पर्यंत लातूर ते मिरज या ३२५ किमीच्या मार्गावर पूर्ण शक्तीने धावू लागली. १९१५ ला पंढरपूर येथे रेल्वे स्थानक उभारण्यात आले. त्या वर्षी खऱ्या अर्थाने बार्शी लाईटची ओळख देवाची गाडी अशी बनली. या दुष्काळी भागात रेल्वे सुरू करण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिलं ते कॅलथोर्प नॅरोगेज रेल्वेचा उद्गाता म्हणून जगभरात रेल्वे जिनियन म्हणून ओळखला गेला. १९२७ ला त्याचं निधन झालं. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी भारतीय रेल्वेने बार्शी लाईटचा ताबा स्वतःकडे घेतला. 

त्या परंपरेला २००६ नंतर लागला विराम...

पुढे भारतातील सुरु होणा-या रेल्वे गाड्या आधुनिक होत गेल्या. मात्र जवळपास नव्वद वर्षे या देवाच्या गाडीने विठूमाउलीची सेवा केली. यावेळी इतर गाड्यांच्या वेगाशी सामना करणे भाग होते. 
लाखोंनी वारकरी विठुमाऊलीचा जयजयकार करत टाळ अभंगाच्या सोबतीने त्या रेल्वेतून येत जात होते. त्या परंपरेला २००६ नंतर टप्याटप्याने विराम देण्यात आला. 

पंढरपूर स्थानकावर सध्या सन्मानाने उभी...

बार्शी लाईट या रेल्वेचे प्रतीक म्हणून एक लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिन पंढरपूर स्थानकावर सध्या सन्मानाने उभे करण्यात आले आहे. मध्यंतरी मिरजेहुन लातूरला पाणी पोहचवून दुष्काळी मराठवाड्याची तहान भागवण्याचा प्रयोग याच मार्गावर करण्यात आला. देवाच्या गाडीचा वेग हळू होता. मात्र प्रदीर्घ काळ वारकरी संप्रदाय आपल्या परीने प्रवाहित ठेवणारी ती जिवंत लोकवाहिनी ठरली होती. आता बार्शीचा ट्रॅक ब्रॉड गेज होऊन तिथे एक्स्प्रेस गाड्या धावतात मात्र वारकऱ्यांचा साधेपणा आणि भक्तीभावात रमलेली देवाची गाडी कोणीही विसरू शकणार नाही. १८९७ ला बार्शी लाईट गाडी सुरु झाल्यापासून ते २००६ पर्यंत तिचा सुरु असलेला प्रवास अनेकांना स्मरणात राहणारा होता.