
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम दर्ग्यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांचे महत्वाचे आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. तात्काळ माहीमधील जागा पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याकडे समुद्रात अनधिकृत बांधकाम केल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा देखील दिला आहे.
माहीम परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तणाव वाढू नये, म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका यांना दिसलं नाही?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई पोलीस आयुक्त यांनी अतिरीक्त आयुक्तांना जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. यांनतर याचा अहवाल मुंबई पालिकेकडे पाठवण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांच्या हालचाली वाढल्या आहेत. एबीपी माझाने ही माहिती दिली आहे.
माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. जे होईल ते होईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.
देशातील राज्यघटना मानणाऱ्या मुसलमानांना मला विचारायचं आहे की, हे तुम्हाला मान्य आहे का? आम्हाला ताकद दाखवण्याची इच्छा नाही पण गरज पडली तर ताकद दाखवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असे देखील राज ठाकरे म्हणाले.