
Aurangzeb Controversy : इम्तियाज जलील यांचे बदलले सूर? म्हणाले, 'औरंगजेबाशी आमचा संबंध नाही; कबर जिथे…'
राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. यानंतर या दोन्ही शहरांची नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे करण्यात आले.
याविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमीका घेतली होती, यानंतर आता आमचा औरंगजेबाशी काही संबंध नसल्याचे वक्तव्य जलील यांनी केले आहे. त्यामुळे जलील यांचे सूर बदलले का असा प्रश्न विचारला जातोय.
छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात जलील आंदोलन करत आहेत. यावर भाजप आणि शिंदे गटाकडून टीका केली जात आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचं आंदोलन नाही तर बिर्याणी पार्टी आहे, तसेच औरंगजेबाची कबर औरंगाबादमधून हटवा अशी मागणी केली आहे. यानंतर जलील यांनी आम्हाला औरंगजेबाशी काही घेणं देणं नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार खासदार जलील यांनी आम्हाला औरंगजेबाशी काही घेणं देणं नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही. जसं शहराचं नामांतर आमच्यावर लादलं तसा औरंगजेब आमच्यावर का लादता? असा प्रश्न देखील विचारला आहे.
औरंगजेबाची कबर जिथे हलवायची तिथे हलवा, आम्हाला विचारताय की सांगताय हे कळायला मार्ग नाही आणि जर आमची परवानगी हवी असेल तर त्याचं एक पत्र घेऊन या, मग आम्ही बघू परवानगी द्यायची की नाही, असा टोलाही जलील यांनी लागावला.
हेहे वाचा - तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
काही दिवसांपूर्वी जलील यांच्या नामांतराविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावेळी काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकवल्याने देखील काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा देखील दाखल केला.
उपोषण नाही, साखळी आंदोलन
दरम्यान या आंदोलनाविषयी जलील यांनी खुलासा केला आहे, आमचं उपोषण नाही तर साखळी आंदोलन आहे. त्यामुळे तिथे रोजच जेवण होणार. कदाचित माझं पहिल्या दिवशी मराठी चुकलं असेल म्हणून मी उपोषण म्हणालो असेल, असे जलील म्हणाले.
एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी या नामांतराला विरोध करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी औरंगाबादचं नामांतर झाल्यामुळे अनेकजण उड्या मारत आहेत, पण मी जन्मही औरंगाबादमध्येच घेतला आणि माझा मृत्यूही औरंगाबादमध्येच होणार, आणि मी खासदारही औरंगाबादचाच आहे आणि औरंगाबादचाच राहणार असं वक्तव्य केलं होतं.