
Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ! 50 आमदार हक्कभंग आणणार
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे विधानसभा अध्यक्षांवर खालच्या पातळीवर टीका आणि बेताल आरोप करीत आहेत. विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख पीठासीन अधिकारी आहेत.
अशा घटनात्मक पदावरील व्यक्तीविरोधात गंभीर आरोप करता येत नसल्याचे सांगत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आज दाखल केला. राऊत विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप शिरसाट यांनी नार्वेकरांना दिलेल्या पत्रात केला आहे. राऊत यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत.
दबावाला बळी पडणार नाही : नार्वेकर
दुर्योधनाच्या बाजूने उभे राहणार असाल तर कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवा, अशी टीका संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली होती. ‘संसद सदस्याने संविधानिक पद्धतीने जबाबदारीने भाष्य करणे गरजेचे असते. पण अशी अपेक्षा काही व्यक्तींकडून करणे व्यर्थ आहे.
तेव्हा त्यांना दुर्लक्षित करणे हेच लोकशाहीच्या दृष्टीने योग्य राहील. आजपर्यंत मी कोणत्याही दबावाला बळी पडून काम केले नाही, यापुढेही करणार नाही. धमक्या देऊन माझ्याकडून त्यांना हवा तसा निर्णय घेऊ असे जर त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा सर्वात मोठा गैरसमज आहे,’’ अशा शब्दांत राऊत यांना नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिले.