कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात 15 हजार रुपयांची वाढ करा - मुनगंटीवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 जानेवारी 2019

मुंबई - आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या डॉक्‍टरांना देण्यात येणाऱ्या दरमहा 45 हजार रुपयांच्या व इतर भागात काम करणाऱ्या डॉक्‍टरांच्या 40 हजार रुपयांच्या मानधनात 15 हजार रुपयांची वाढ करण्यात यावी आणि अर्थ विभागाने त्यास तत्काळ मान्यता द्यावी, असे आदेश आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. 

मंत्रालयात यासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रमाणेच आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या विशेषज्ञांना दरमहा 55 हजार रुपयांचे मानधन देण्यात येते व इतर भागांत काम करणाऱ्या विशेषज्ञांना 50 हजार रुपयांचे मानधन देण्यात येते. या वर्गातील मानधनही 15 हजार रुपयांनी वाढवण्यात यावे अशा सूचना देऊन मुनगंटीवार म्हणाले, की शासनाच्या आरोग्य योजना प्रभावीपणे ग्रामीण भागात राबविण्यासाठी पुरेशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असते. शासनाने यासाठी जाहिरात दिल्यानंतर अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन दुर्गम, आदिवासी आणि ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्यसेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी मानधन वाढवण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळेच अर्थ विभागाने आरोग्य विभागाच्या मानधनवाढीच्या या प्रस्तावास तत्काळ मान्यता द्यावी, असेही ते म्हणाले. 

Web Title: The increase of Rs 15 thousand contractual medical officers Honorarium