इंदापूर विधानसभेच्या जागेवरून पेच  

राजकुमार थोरात
सोमवार, 7 मे 2018

वालचंदनगर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाटेल ते झाले तरी चालेल, इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही, असे वक्तव्य केले असताना माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही कुठल्याही स्थितीत काँग्रेस जागा लढविणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक अद्याप दूर असली तरी या जागेवरून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संभाव्य आघाडीत या जागेवरून पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

आमदार दत्तात्रेय भरणे यांनी ३० एप्रिल रोजी अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या माध्यमातून भरणे यांनी आगामी विधानसभेच्या दृष्टीने शक्तिप्रदर्शन केले. या वेळी अजित पवार यांनी इंदापूरच्या जागेवर हक्क सांगितला. भले आघाडी झाली नाही तरी चालेल, पण जागा सोडणार नाही असे सांगत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांना आव्हान दिले. हर्षवर्धन पाटील यांनीही आघाडीचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार असल्याचे सांगून अजित पवारांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देऊ नका, असा संदेश काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. तसेच इंदापूरची जागा लढविणार असे ठामपणे सांगितले. 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. शरद पवार यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांचे सलोख्याचे संबंध आहेत. तसेच गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना इंदापुरातून मताधिक्‍य देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे या जागेबाबत शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण सन २००९ च्या निवडणुकीत भरणे बंडखोरी करून उभे राहिले असता शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती.  

अजित पवारांकडून भरणेंना ताकद 
हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी अजित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच ते दत्तात्रेय भरणे यांना ताकद देत आहेत, अशी चर्चा तालुक्‍यात आहे. 

Web Title: Indapur Assembly constituency NCP & Congress politics