भटक्‍या विमुक्तांसाठी स्वतंत्र आयोग हवा : रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पंढरपूर : भटक्‍या विमुक्तांसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करावी; तसेच या समाजाच्या पुनर्वसनासाठी त्या-त्या गावात जमीन द्यावी, नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. 

धुळे जिल्ह्यातील घटनेत मंगळवेढा तालुक्‍यातील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील ज्या कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीशिवाय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पारधी, नाथपंथी डवरी गोसावी, कैकाडी, कोल्हाटी अशा समाजाला त्या-त्या गावात जमीन देऊन त्यांचे पुनर्वसन करून त्यांची भटकंती थांबवली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. 

"दोन वर्षांत देशभरात फिरून आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून लाखो लोकांना मी मदत केलेली आहे. ऍट्रॉसिटी ऍक्‍टमध्ये बरेचसे परिवर्तन केले. 85 हजारांपासून सव्वाआठ लाखांपर्यंत मदत दिली आहे. एकवीस कारणांसाठी ऍट्रॉसिटी लागत होती, ती आता 42 कारणांसाठी लावण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आपण आपल्या दोन वर्षांच्या मंत्रिपदाच्या कामावर समाधानी आहोत. विरोधकांनी कितीही कांगावा केला, तरी त्याचा उपयोग होणार नाही. पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात सत्तेवर येईल आणि त्यानंतर प्रलंबित प्रश्‍नांवर निर्णय घेतले जातील,'' असे आठवले म्हणाले. 

Web Title: An independent commission for wandering exempters says Ramdas Athavale