
2004 च्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू रिंगणात होते. यावेळी ते विजयी होणार याची खात्री सर्वांना होती. परंतु, त्यांना परत एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. असे असतानाही 2004 च्या विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून त्यांनी चांगलाच जोर लावला अन् नागरिकांनी प्रचंड मतांनी बच्चू कडू यांना निवडून दिले.
अमरावती : वेगळ्या शैलीतील आंदोलनाने बच्चू कडू यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन, साप आंदोलन, अर्धदफन आंदोलन, डेरा आंदोलन, आसूड यात्रा, राहुटी आंदोलन, जलसमाधी, स्वतःला उलटे लटकवून आंदोलन, रक्तदान आंदोलन, मुंडण आंदोलन अशा अनेक आंदोलनाने त्यांनी प्रशासनाला जागे केले. यातील सर्वांत जास्त आंदोलने शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी झाले. 2004 पासून तेच अचलपूरचे आमदार आहेत. शेतकऱ्यांसाठी लढणारे बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा ग्रामपंचायतच्या सदस्यापासून बच्चू कडू यांच्या राजकीय तसेच सार्वजनिक जीवनातील प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर ते चांदूरबाजार पंचायत समितीचे सभापती झाले. सभापती असताना गरिबांच्या शौचालयाच्या बांधकामातील भ्रष्टाचार त्यांनी उघड केला. अधिकाऱ्यांना शौचालयाच्या सीट भेट देऊन पहिले अनोखे आंदोलन झाले. तेव्हापासून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे बच्चू कडू प्रकाशझोतात आले. अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या आंदोलनाची मालिका सुरू झाली व जिल्ह्यात बच्चू कडू या नावाचा झंझावात सर्वांच्या परिचयाचा झाला.
1999 साली लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली. पैसा नसल्याने फॉर्म भरणेसुद्धा कठीण झाले होते. त्यावेळी लोकांनी पैसा गोळा केला. काही महिलांनी मंगळसूत्र गहाण ठेवले. लोकांनीच ही निवडणूक लढविली; परंतु त्यांचा पराभव झाला. मात्र, या पराभवाने ते खचले नाहीत. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू रिंगणात होते. यावेळी ते विजयी होणार याची खात्री सर्वांना होती. परंतु, त्यांना परत एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. असे असतानाही 2004 च्या विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून त्यांनी चांगलाच जोर लावला अन् नागरिकांनी प्रचंड मतांनी बच्चू कडू यांना निवडून दिले. 2004 पासून तेच अचलपूरचे आमदार आहेत.