'मुख्यमंत्री बदलले तर सरकारचा पाठिंबा काढणार'

गुरुवार, 26 जुलै 2018

भाजपमध्ये आणि इतर सहयोगी पक्षात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असतानाच अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री बदलले तर सरकारचा पाठिंबा काढणार असल्याचे सांगितले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई - भाजपमध्ये आणि इतर सहयोगी पक्षात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असतानाच अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री बदलले तर सरकारचा पाठिंबा काढणार असल्याचे सांगितले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यातच सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या विषयाला काल हात घातला होता. मुख्यमंत्री बदलाची चर्चा फक्त राजकीय वर्तुळात नाही, तर भाजपमध्येही सुरू असल्याचा दावा त्यांनी केला होता. परंतु, रवी राणा यांच्यासह सहा अपक्ष आमदार आज देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले आहेत.

फडणवीस यांच्यासोबत काम करताना आम्हाला चांगला अनुभव आल्याचा त्यांनी नमूद केले. फडणवीस यांनी जनतेची काम केली असून यापुढेही ते चांगले काम करतील. फडणवीस यांच्यामुळे शिवसेना सत्तेत असल्याचेही त्यांनी सांगतले. त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य कसे चालवावे हे चांगले माहीत आहे. त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला चांगला अनुभव आला आहे. यापुढेही ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. जर मुख्यमंत्री बदलले तर आम्ही सरकारचा पाठिंबा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, महाराष्ट्रात एकूण सात अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू वगळता इतर सहा आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यात, रवी राणा, गणपत गायकवाड, किशनराव जाधव पाटील, मोहन फड आणि शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. या गटाचे नेतृत्व रवी राणा करत आहेत.

Web Title: Independent Mla Ravi Rana Warns Bjp If cm Changes We Will Withdraw Support government