आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे झालो?'- शिवसेना

टीम ई सकाळ
सोमवार, 8 मे 2017

युरोप खंडातील यच्चयावत राष्ट्रे ‘ख्रिश्चन’ राष्ट्र म्हणून अभिमानाने मिरवतात. अमेरिका, रशियासारख्या राष्ट्रांचा धर्म ख्रिश्चन आहे. ५६ देश इस्लामिक रिपब्लिक आहेत. जपान, चीन, श्रीलंका, म्यानमारसारखी राष्ट्रे बौद्ध धर्मास डोक्यावर घेऊन उभी आहेत. पण जगाच्या पाठीवर एकही हिंदुराष्ट्र नसावे यांची शिवसेनेने व्यक्त केली आहे. 

मुंबई : "ज्यांच्याकडून निधर्मी भारताला हिंदूराष्ट्र करण्याची अपेक्षा होती त्यांनी ‘युनो’त भारत निधर्मी असल्याची बांग दिली," अशी टीका शिवसेनेने केली आहे. '‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे झालो?' असा चिमटा शिवसेनेने काढला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ तथा ‘युनो’मध्ये मोदी सरकारने ‘‘आम्ही निधर्मी आहोत. देश धर्मनिरपेक्ष आहे!’’ असे जाहीर केले, हे धक्कादायक आहे. या सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

भारताचे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीच भारत सरकारच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनिव्हा येथील मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात बोलताना हे स्पष्टीकरण दिले. शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला लक्ष्य करीत पक्षाचे मुखपत्र 'सामना'मधून टीका केली आहे. "हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही हा देश निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही," असे म्हणत सेनेने पुन्हा एकदा राममंदिर आणि गुजरातमधील हिंसाचाराचा मुद्दा उकरून काढला आहे. 

हे हिंदूराष्ट्रच
१९४७ मध्ये धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर उरलेला भारत देश म्हणजे हिंदुराष्ट्रच मानायला हवे, पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही येथे जे दोनेक कोटी मुसलमान राहिले त्यांच्या लांगूलचालनासाठी आपण स्वतःला ‘निधर्मी’ म्हणण्यातच धन्यता मानली. त्यांच्या दोन कोटींचे आज बावीस कोटी झाले व ते २२ कोटी धर्माच्या नावावर आपल्याला भारी पडत असतानाही आपण सेक्युलरवादाची बांग देत शेपूट घालणार असू तर हा देश रामाचा, कृष्णाचा आणि सोमनाथाचा उरणार नाही. 

लाज कसली बाळगायची?
हिंदुराष्ट्राची स्वच्छ संकल्पना मांडून जागतिक व्यासपीठावर सरकारला सांगता आले असते की, ‘‘होय, आम्ही हिंदुराष्ट्र आहोत!’’ त्यात लाज कसली बाळगायची? युरोप खंडातील यच्चयावत राष्ट्रे ‘ख्रिश्चन’ राष्ट्र म्हणून अभिमानाने मिरवतात. अमेरिका, रशियासारख्या राष्ट्रांचा धर्म ख्रिश्चन आहे. ५६ देश इस्लामिक रिपब्लिक आहेत. जपान, चीन, श्रीलंका, म्यानमारसारखी राष्ट्रे बौद्ध धर्मास डोक्यावर घेऊन उभी आहेत. पण जगाच्या पाठीवर एकही हिंदुराष्ट्र नसावे यांची शिवसेनेने व्यक्त केली आहे. 

Web Title: india is hindu nation not secular, claims shiv sena