भारताची अर्थिक महासत्तेकडे वाटचाल- उपराष्ट्रपती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

भारत झपाट्याने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वित्तीय संस्थांनीसुद्धा ही बाब मान्य केली असल्याचे ते म्हणाले. प्रा.यशवंतराव केळकर स्मृतीनिमित्त आयोजित प्रथम व्याख्यान कार्यक्रमात 'नेशन फर्स्ट' या विषयावर उपराष्ट्रपती नायडू यांनी आपले विचार व्यक्त केले.

मुंबई : भारत झपाट्याने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वित्तीय संस्थांनीसुद्धा ही बाब मान्य केली असल्याचे ते म्हणाले. प्रा.यशवंतराव केळकर स्मृतीनिमित्त आयोजित प्रथम व्याख्यान कार्यक्रमात 'नेशन फर्स्ट' या विषयावर उपराष्ट्रपती नायडू यांनी आपले विचार व्यक्त केले.

मुंबई शेअर बाजारच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, गेल्या काही वर्षात विश्वगुरू बनण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. यावेळी अध्यक्षस्थानी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तर प्रमुख पाहुणे म्हणून बीएसईचे मुख्य आर्थिक अधिकारी नयन मेहता, सुनिल आंबेकर, आशिष चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रा.यशवंतराव केळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमाला सुरू केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी मराठीतून आयोजकांचे कौतुक केले. प्रो. केळकर यांच्यासोबत विद्यार्थीदशेतच काम करण्याची संधी मिळाली. ते अनेकांचे मार्गदर्शक आणि चांगले मित्र होते, असेही उपराष्ट्रपती नायडू म्हणाले.

'नेशन फर्स्ट' असे म्हणत असताना केवळ देश प्रथम असाच त्याचा अर्थ नाही. सर्वांना समान संधी, समाजातील शेवटच्या घटकांचा विकास, महिलांना बरोबरीचे स्थान, गरिबी निर्मूलन, एक देश, एक नागरिक आणि देशाबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेला आदर या बाबी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. 'नेशन फर्स्ट'चा विचार मांडताना प्रत्येकाने रचनात्मक, सकारात्मक कामाने देशाच्या विकासासाठी कसे योगदान देऊ शकू, याचा विचार केला पाहिजे. यासोबतच देशाच्या भविष्यासाठी प्रकृती, संस्कृती आणि एकात्मतेचा विचारही आवश्यक आहे. देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जात असताना काही आव्हानेसुद्धा आहेत. त्या आव्हानांचा सामनासुद्धा करावा लागणार असल्याचे उपराष्ट्रपती नायडू यांनी सांगितले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. सुरुवातीस मराठी भाषेतून त्यांनी प्रो.यशवंतराव केळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रत्येक युवक पदाने मोठा व्यक्ती होऊ शकत नसला तरी चांगला राष्ट्रपुत्र मात्र बनू शकतो. आपल्या सकारात्मक दृष्टीकोनातून उद्योग, व्यवसाय, सामाजिक क्षेत्र आणि राजकारणातसुद्धा चांगली संधी निर्माण करू शकतो, असेही राज्यपाल म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India will be economic superpower says Vice President naidu