
Cooking Oil Price: निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; खाद्यतेलाच्या दरात घसरण
Cooking Oil Price: देशातील तेल उत्पादक कंपन्यांनी सरकारच्या सूचनेनुसार खाद्यतेलाच्या दरात कपात करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पुढील एक ते तीन आठवड्यात विविध ब्रँडेड खाद्यतेल कमी केलेल्या दरात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने आज याबाबत खाद्यतेल उद्योगांची संघटना सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसएई) सदस्यांबरोबर बैठक घेतली.
खाद्यतेलाच्या किमतीत झालेली घसरण त्वरीत ग्राहकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी येथील प्रमुख उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत सांगितले.
तत्पूर्वी, ‘एसएई’ने सदस्यांना खाद्यतेलांच्या छापील कमाल किंमतींमध्ये कपात करण्याची सूचना केली होती. त्यानुसार, विविध खाद्यतेल कंपन्यांनी पॅकबंद खाद्यतेलाचा कमाल किरकोळ किंमती कमी करण्यास सुरूवात केली आहे.
मदर डेअरी, अदानी विल्मर आदी कंपन्यांनी खाद्यतेलाचे दर प्रति लिटर सरासरी १० ते १७ रुपयांनी कमी केल्या आहेत. मदर डेअरीने धारा या ब्रँडअंतर्गत विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलांच्या कमाल किरकोळ किमती (एमआरपी) प्रति लिटर १५ ते २० रुपयांनी कमी केल्या आहेत. कंपनीचे सोयाबीन, राइसब्रॅन, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेल सुधारित दरासह पुढील आठवड्यात बाजारात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
फॉर्च्युन या ब्रँड नावाने खाद्यतेल विक्री करणाऱ्या अदानी विल्मर कंपनीने आणि जेमिनी ब्रँडची कंपनी जेमिनी एडिबल आणि फॅट्स इंडिया यांनी अनुक्रमे पाच रुपये लीटर आणि दहा रुपये लिटर असे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना या दरकपातीचा फायदा येत्या तीन आठवड्यांत मिळेल, असे या कंपन्यांनी म्हटले आहे.
गेल्या सहा महिन्यांत आणि विशेषत: गेल्या ६० दिवसांत आंतरराष्ट्रीय किमतीत झपाट्याने घट झाली आहे, तसेच भुईमूग, मोहरी, सोयाबीन आणि पिकांचे विक्रमी उत्पादन असूनही स्थानिक भाव आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अनुषंगाने कमी झालेले नाही.
बहुतेक ब्रँड्सनी काही काळापूर्वी किमती कमी केल्या आहेत, परंतु तरीही बाजारात पॅकबंद खाद्यतेलाची सध्याची कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याच्या किमतींशी सुसंगत नाही. देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती सध्या चढ्याच असल्याचे दिसते, असे ‘एसएई’ने म्हटले आहे.