मोठी बातमी! रेमडेसिवीर औषधाबाबत आयएमएनं केली महत्वाची मागणी; वाचा सविस्तर बातमी .

भाग्यश्री भुवड
सोमवार, 13 जुलै 2020

ज्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्या राज्याला रेमडेसिवीरचा पुरवठा अधिक हे सूत्रे कंपन्यांनी आणि केंद्राने स्वीकारावे अशी मागणी आयएमए म्हणजेच भारतीय वैद्यकीय परिषदेने केली आहे.

मुंबई: ज्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्या राज्याला रेमडेसिवीरचा पुरवठा अधिक हे सूत्रे कंपन्यांनी आणि केंद्राने स्वीकारावे अशी मागणी आयएमए म्हणजेच भारतीय वैद्यकीय परिषदेने केली आहे. राज्यात देशातील 40 टक्के कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे, बाजारात रेमडेसिवीरची जो काही साठा येईल, त्यातील अधिक साठा महाराष्ट्राला द्यावा अशी मागणी आयएमएने केली आहे. त्यामुळे, रुग्णसंख्येनुसार पुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे. 

रेमडेसिवीरच्या निर्मितीसाठी दोन भारतीय कंपन्यांना परवानगी मिळाली. त्यानंतर, जो साठा उत्पादित झाला, तो सगळा साठा तामिळनाडूने उचलला. त्यामुळे, इतर राज्यांना काहीच मिळाले नाही. तर, आताही रेमडेसिवीरच्या पुरवठ्याचे कोणतेही सूत्र नाही. तेव्हा रुग्णसंख्या कमी असताना साठा करुन ठेवला जात आहे. दुसरीकडे रुग्णांना इंजेक्शन मिळत नसल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा: मुंबईजवळचा 'हा' जिल्हा ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

महाराष्ट्र राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने 11 जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, कोरोनाच्या रुग्णांसाठी टॉसिलीझुमॅब आणि रेमडेसिविर ही दोन महत्वाची इंजेक्शन्स रूग्णालयाच्या किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनवरच मिळणार आहेत. त्यासोबत पेशंट्सचा कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट आवश्यक केला आहे. या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी केलेल्या या उपायांकरता महाराष्ट्र सरकार निश्चीतच प्रशंसेस पात्र आहे. परंतु, रुग्णांच्या उपचारासाठी टॉसिलीझुमॅब आणि रेमडेसिविर ही इंजेक्शन्स त्वरित उपलब्ध होणे आवश्यक आहे. सध्या ती रूग्णालयांच्या आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनवर देखील मिळत नाहीत.

30 टक्के रुग्णांचे रिपोर्ट कोरोनाचा आजार असतानाही निगेटिव्ह येतात. अशा रुग्णांना देखील वरील दोन्ही इंजेक्शन्सची अतिशय निकडीची गरज असते. रिपोर्ट निगेटिव्ह असल्यामुळे त्याच्यासाठी इंजेक्शन्स न मिळाल्याने त्यांची तब्येत गंभीर होऊन रुग्णांच्या जीवाला धोका होऊ शकतो.

महाराष्ट्रात इतक्या रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता:

महाराष्ट्रात आज कोरोनाच्या सुमारे 1 लाख अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यातले 20 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आणि रेमडेसिविर इंजेक्शन्सची गरज असते. या रुग्णांना प्रत्येकी 6 इंजेक्शन्सची गरज भासते. त्यात 30 टक्के रुग्ण हे चाचणी अहवाल निगेटिव्ह असलेले धरले तर आजमितीला महाराष्ट्रात सुमारे 25 हजार रुग्णांना एकूण 1,50, 000 रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. याच बरोबर सध्या 7,500 पेक्षा जास्त रुग्णांचे नव्याने निदान होते आहे. यापैकी 20 टक्के म्हणजे 1500 रुग्णांना इंजेक्शन रेमडेसिव्हिरची गरज भासणार आहे. याचाच अर्थ इथून पुढे दररोज या इंजेक्शनच्या दररोज किमान 10 ,000 व्हायल्सची गरज भासणार आहे. 

ही सर्व गरज लक्षात घेता, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करत आहे, की या इंजेक्शन्सचा पुरेसा पुरवठा शासनाने करून ती सर्व रुग्णांना त्वरित प्राप्त होण्यासाठी तातडीची उपाय योजना करणे आवश्यक आहे. 

हेही वाचा: नवऱ्याच्या गाडीत पाहिलं 'ती'ला आणि बायकोने केली आख्खी मुंबई जॅम...

कोव्हिड पॉझिटीव्ह रिपोर्टची अट रद्द: 

त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन, रूग्णालयात दाखल असल्याचा दाखला आणि इंजेक्शन्सची गरज असल्याबाबत डॉक्टरांचे रुग्ण तपासणीचे निष्कर्ष मागवावेत. कोव्हिड पॉझिटीव्ह रिपोर्टची अट रद्द करण्यात यावी असे स्पष्ट मत आयएमए अध्यक्ष
डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

indian medical association seeks about supply of remdesivir 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian medical association seeks about supply of remdesivir